महाराष्ट्रातील हिंगोली (Hingoli) येथून एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. हिंगोली येथील शासकीय रुग्णालयातील ज्योती गवळी (Jyoti Gavli) या प्रसूतीसाठी सर्वांच्या आवडत्या परिचारिका होत्या. त्यांनी सुमारे पाच हजार महिलांची नॉर्मल आणि सिझेरियन प्रसूती यशस्वीपणे केली होती. मात्र, रविवारी त्यांच्या स्वतःच्या प्रसूतीदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी पसरताच रुग्णालयात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. आपल्या दुसऱ्या मुलाच्या प्रसूतीदरम्यान ज्योती यांचा मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यात राहणाऱ्या 38 वर्षीय ज्योती गवळी यांनी 2 नोव्हेंबर रोजी हिंगोली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या मुलाला जन्म दिला.
ज्योती यांनी सिझेरियन पद्धतीने एका सशक्त मुलाला जन्म दिला. प्रसूतीनंतर त्यांना न्यूमोनिया झाला व त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यांचा सतत रक्तस्त्राव होत होता. अशावेळी त्यांना हिंगोली येथील शासकीय रुग्णालयातून नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती खालावत राहिली आणि अखेर रविवारी (14 नोव्हेंबर) त्यांचा मृत्यू झाला.
जिथे एकीकडे डॉक्टर रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न करत होते, तिथे दुसरीकडे ज्योती यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, काही होण्यापूर्वीच त्यांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. आरोग्य अधिकाऱ्याने मंगळवारी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. हिंगोली येथील रुग्णालयात त्यांच्यासोबत काम करणाऱ्या परिचारिकांनी सांगितले की, त्यांच्या सुमारे पाच वर्षांच्या सेवेत त्यांनी सुमारे 5000 प्रसूतींना मदत केली असेल. (हेही वाचा: कल्याण रेल्वे स्थानकात चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचे देवासारख्या धावून आलेल्या व्यक्तीने वाचवले प्राण, पहा Viral Video)
ज्योती यांनी त्यांच्या गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत काम केले आणि नंतर त्या प्रसूतीसाठी गेल्या. मुलाच्या जन्मानंतर त्या प्रसूती रजेवर जाणार होत्या. गेल्या दोन वर्षांपासून त्या हिंगोली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. त्याआधी त्यांनी इतर आरोग्य केंद्रात तीन वर्षे काम केले होते.