Rains | (Photo Credit - Twitter)

हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस (Heavy Rain) झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बोरी सावंत, हापसापुर, टेंभुर्णी, विरेगाव, आरळ, बळेगाव या गावांसह इतर गावांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. पावसाचा लहरीपणामुळे शेतातील उभी पिकं करपून जात असताना मंगळवारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. शेंगा लागलेलं सोयाबीन, बोंड लागलेलं कापूस, तोडणीस आलेला ऊस यासह सर्वच पिके शेतात आलेल्या पुरामुळे जमीनदोस्त झालेली आहेत.  (हेही वाचा - Pune Rain: पुण्यात मुसळधार पाऊस, गणपती दर्शनासाठी आलेल्या भाविकांची धावपळ)

वसमत तालुक्यातील शेकडो एकरवरील पिकांचे अशाच पद्धतीने नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून, सरकारने मदतीची घोषणा करण्याची मागणी केली जात आहे. सोबतच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे, त्यांना विमा मंजूर करून नुकसानभरपाई देण्याची सुद्धा मागणी होत आहे.

हिंगोलीत झालेल्या या पावसामुळे नद्या, नाल्यांना पुर आल्याचे चित्र होते. अनेक ठिकाणी तर थेट गावात पाणी घुसल्याची परिस्थिती पाहायला मिळाली. वसमत तालुक्यात बळेगाव, तसेच अन्य एका गावात गावालगत असलेल्या नाल्याचे पाणी शिरल्याने काही वेळ गावकऱ्यात खळबळ उडाली होती. मात्र, पावसाचा वेग कमी झाल्याने नंतर हळूहळू पाणी देखील ओसरत गेले. जोरदार पावसामुळे औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर धरणामध्ये देखील पाण्याची वाढ होतांना पाहायला मिळत आहे. सिद्धेश्वर धरणात 2.728 दलघमी पाण्याची आवक झाली आहे.