Uday Samant | (Photo Credit - Twitter)

राज्यातील कोरोना व्हायस (Coronavirus) संक्रमितांची संख्या आणि त्याच्यासोबतच आमायक्रोन (Omicron) संक्रमितांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाची पहिली आणि दुसरी कोरोना लाट ओसरल्या नंतर सुरु करण्यात आलेली महाविद्यालयं आणि विद्यापीठे सुरु राहणार की पुन्हा बंद होणार? याबाबत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंत यांनी राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरु आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी राज्यातील कोरोना स्थिती आणि विद्यापीठ कार्यक्षेत्रात कोरोना महामारीचा प्रभाव यांसह इतरही बाबींची माहिती घेतली. दरम्यान, राज्यातील वाढती कोरोना व्हायरस स्थिती विचारात घेऊन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी एक अहवाल मागवला आहे. या अहवालानंतरच राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठे सुरुच ठेवायची की बंद याबाब निर्णय घेतला जाईल असे त्यांनी म्हटले.

भारतातील एकूण कोरोना व्हायरस आणि ओमायक्रोन रुग्णसंख्येत महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. त्यामुळे ही स्थिती आणखी बिघडू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. राज्यात आता विविध महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये परीक्षा होऊ घातल्या आहेत. अभ्यासक्रमांनाही गती आली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये, विद्यापीठे सुरु ठेवायची की पुन्हा ती बंद करायची याबाबत या याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. याशिवाय विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये काम करणारे कर्मचारी, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबतही चर्चा झाल्याचे ते म्हणाले. येत्या 3 जानेवारीला राज्यातील कुलगुरुंसोबत आणखी एखादी बैठक घेतली जाण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या कुलगुरुंकडून जो काही अहवाल येईल त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असेही उदय सामंत यांनी सांगितले. (हेही वाचा, COVID-19 Updates In India: वाढत्या ओमायक्रोन संसर्गामुळे देशासमोर नवे आव्हान, 23 राज्यांत 1431 रुग्ण, महाराष्ट्रात सर्वाधिक 454 जण संक्रमित)

दरम्यान, भारतात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या मोठ्या वेगाने वाढते आहे. त्यातच ओमायक्रोन या नव्या स्ट्रेनची भर पडल्याने चिंता अधिकच वाढली आहे. देशातील 23 राज्यांमध्ये आतापर्यंत आमायक्रोन रुग्ण आढळले आहेत. संपूर्ण देशाचा विचार करता देशभरात ओमायक्रोन संक्रमितांची संख्या 1431 इतकी झाली आहे. त्यापैकी 488 जण उपचार घेऊन बरेही झाले आहेत. ओमायक्रोन रुग्णांची देशातील आकडेवारी पाहता सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात ओमायक्रोनचे 454 रुग्ण आढळले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली आहे. दिल्लीत ओमायक्रोनचे 351 रुग्ण आढळले आहेत.