हवामान खात्याने (Meteorological Department) यावर्षीचा मान्सूनचा (Monsoon) हंगाम संपल्याची घोषणा केल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता. मात्र आज दुपारपासून पुण्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. सध्याचा पावसाचा जोर पाहता पुणे पुन्हा पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात अचानक ढगफुटी झाली होती. त्या एका दिवसाच्या प्रलयात 20 पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमावला लागला होता. सोबत नागरिकांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा पुण्याला पावसाने झोडपले आहे.
दुपारी 4 वाजता पावसाला सुरुवात झाली होती. विजांच्या कडकडाटासह 1 तास हा पाऊस बरसला व थोड्याच वेळात पुण्यातील अनेक मुख्य रस्ते जलमय झाले. कात्रज, वारजे, म्हात्रे ब्रिज, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, दत्तवाडी या भागांमध्ये वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे. या पावसाचा सर्वात जास्त फटका दुचाकी व चारचाकींना बसला आहे. या पावसामुळे अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे.
(हेही वाचा: पुण्यात पुढील पाच दिवस ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसण्याची शक्यता)
दरम्यान, 3 ऑक्टोबर रोजी पुण्यात पुढील 5 दिवस ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हा कदाचित परतीचा पाऊस असू शकतो, असेही सांगण्यात येत आहे. 5 ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे. 6 ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.