पूर | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Twitter)

मागच्या वर्षी मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) कोल्हापूर (Kolhapur), सातारा (Satara), सांगली (Sangli) जिल्ह्यामध्ये पूरस्थिती (Flood) निर्माण झाली होती. त्यावेळी अनेक गावांचा संपर्क तुटला होता, शेती, जमीन, घरे अशा जवळजवळ सर्व गोष्टींचे प्रचंड नुकसान झाले होते. या सर्वांमधून इथली जनता अजूनही सावरत असताना आता पुन्हा एकदा पावसाने इथे थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोल्हापूर व सांगली परिसरात दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पातळी आता 35 फुटांवर पोहोचली आहे. यामुळे कोल्हापूर व सांगलीमध्ये पुन्हा एकदा पूरपरिस्थीती निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पावसाचा जोर आणखी वाढल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 88 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

कोल्हापूर परिसरात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस चालू असल्याने, जिल्ह्यातील सर्व नदी, धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ होत आहे. काल रात्री आठ वाजता कोल्हापूर येथील पंचगंगा नदीची पाणीपातळी 21 फूट होती तर बुधवारी सकाळी ती 32 फूट झाली होती. काल तीन मार्ग वाहतुकीसाठी बंद होते तर आज पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 5 राज्यमार्ग, 9 प्रमुख जिल्हा मार्ग असे 14 मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावड्यात तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस पडत आहे. आज सकाळी प्राप्त झालेला अहवालानुसार इथे 317 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

एएनआय ट्वीट-

पंचगंगेच्या पातळीमध्ये वाढ झाल्याने कोल्हापूर परिसरात पुराचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन सतर्क झाले असून, विविध उपाययोजना योजायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. सांगलीमध्येही अशीच स्थिती असल्याने, सांगलीतील नद्यांच्या काठावर राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या भागात सतत पाऊस पडत असल्याने पाण्याची पातळी वाढत आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी लोकांनी माहितीसाठी 0233-2301820/2302925 वर संपर्क साधावा, असे आवाहन  जिल्हा प्रशासन, सांगली यांनी केले आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. आता पुढील 24 तासांत पुन्हा अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे.