Railway | Representational Image |(Photo Credits: PTI)

Konkan Rain Update: राज्यात सर्वदूर पावसाचा चांगला जोर आहे. कोकणातही पाऊस आठवडाभरापासून पडत आहे. पावसामुळे कोकणातल्या रेल्वे सेवेला चांगलाच फटका बसला आहे. रेल्वे गाड्या उशारीने धावत आहेत. अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला असून पूराचे पाणी अनेक घरांमध्ये शिरले आहे. या पावसामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. एकाच ठिकाणी गाड्या थांबून असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

कोकण रेल्वे विस्कळीत

कोकण रेल्वेवरील अनेक गाड्या उशीराने धावत आहेत. मुंबईहून येणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेन दोन ते अडीच तास उशिराने धावत आहेत. कोकण कन्या एक्स्प्रेस दीड तास उशिराने आहे. मंगळूरू एक्स्प्रेस दोन तास उशिराने आहे. तुतारी एक्स्प्रेस दोन तास उशिराने आहे. तर मडगाव एक्स्प्रेस दोन तास उशिराने धावत आहे. तर मुंबईच्या दिशेने जाणारी मंगला एक्स्प्रेस अडीच तास विलंबाने धावत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे.

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर गुढघाभर पाणी साचले होते. या पाण्यात एसटी बस बंद पडली त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. खालापूर तालुक्यातील कालोते गावाजवळील ही घटना आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड भिंगळोली एसटी डेपो ते शासकिय रेस्टहाऊस तसेच समर्थ अपार्मेट याठिकाणी पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मुसळधार पावसामुळे भात शेती पाण्याखाली गेली आहे. रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान, हवामान खात्याने आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.