Mumbai Rains Update: मुंबई शहर, उपनगरांसह नवी मुंबई, ठाण्यातही संततधार पाऊस; अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, रस्त्यांवर पाणीच पाणी
Mumbai Rain (Photo Credit - Twitter)

आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस (Mumbai) सुरु आहे. मुसळधार पावसामुळं मुंबईच्या सखल भागात पाणी साचलं आहे. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीवर परीणाम झाला आहे. ठाणे, मुंबई, दिवा, कळवा, मुंब्रा या परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. अर्धवट राहिलेल्या रस्त्यांची कामामुळं ठाण्यातील वागळे स्टेट परिसरात ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं आणि मुंबईहून ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. रात्रभर विश्रांती घेतल्यानंतर ठाणे जिल्ह्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. (हेही वाचा - Maharashtra Rain Alert: हवामान विभागाकडून राज्यातील सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, मुंबईसह उपनगरात अतिमुसळधार पावसाची शक्यता)

दरम्यान मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग पहायला मिळाली आहे. यामुळे सखल भागात पाणी साचलेला पहायला मिळाली. अंधेरी सबवे खाली तीन ते चार फूट पाणी भरल्यामुळं अंधेरी सबवे वाहनांसाठी व इतर नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे. मुंबईच्या एलबीएस मार्गावरील वाहतुकही मोठ्या प्रमाणावर मंदावलेली पहायला मिळाली. वाहतुक मंदावलेली असल्याने कार्यालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा मनस्ताप हा सहन करावा लागत आहे.

दरम्यान मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांत पुढील तीन ते चार तास मुसळधार पावसाचा अंदाज हा हवामान विभागाने वर्तवला आहे.  मुंबई आणि ठाण्यासह नवी मुंबई कल्याण - डोंबिवली आणि अंबरनाथ बदलापूरमध्ये देखील मुसळधार पाऊस हा पडत आहे. कल्याण डोंबिवली मध्ये रात्रभर पाऊस कोसळत होता सकाळी एक तासाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. अंबरनाथ बदलापूर परिसरात मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली आहे. रात्री विश्रांती घेतल्यानंतर आज सकाळपासून पाऊसाची जोरदार बॅटिंग पहायला मिळत आहे.