Hanuman Chalisa Row In Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौर्‍यात विघ्न नकोचं कारण सांगत राणा दाम्पत्यांचं आंदोलन मागे; आमदार रवी राणा यांंची घोषणा
रवी राणा । PC: Facebook

मागील दोन दिवसांपासून नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांनी 'मातोश्री' वर हनुमान चालीसा पठण करणार यामुळे वातावरण तंग झाले होते. आक्रमक शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यांना घराबाहेर पडणं मुश्किल केल्यानंतर आता अखेर रवी राणा यांनी आपलं आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे. दरम्यान हे आंदोलन कुणाच्या दबावाखाली झुकून मागे घेत नसून उद्या 24 एप्रिल दिवशी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नियोजित दौरा (PM Narendra Modi Mumbai Visit) असल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता मागे घेत असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे.

काल 22 एप्रिल दिवशी विमानाने अमरावती मधून राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले. खार येथील त्यांच्या निवासस्थानी आले. पण ते मातोश्री या शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घरी येणार हे समजताच शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसेनेची महिला आघाडी, युवा सेना आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरले. त्यांनी मातोश्री बाहेर ठिय्या मांडला. आज सकाळीही 9च्या सुमारास राणा दाम्पत्य राहत असलेल्या इमारतीच्या परिसरात शिवसैनिक घुसले. त्यानंतर पोलिसांनीही राणा दाम्पत्याला खाली न उतरण्याच्या सूचना केल्या. नक्की वाचा:  महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात; पहा मनोज कंबोज गाडी हल्ला प्रकरण ते राज ठाकरेंची औरंगाबाद मधील सभा यावर काय दिली प्रतिक्रिया! 

दरम्यान राणा दाम्पत्याकडून शिवसैनिक गुंडागर्दी करत असल्याची आणि मुख्यमंत्र्यांनीच त्यांना आपल्यावर हल्ला करण्याचे निर्देश दिल्याचे आरोपही केले. उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांवर तेच गुन्हे दाखल व्हायला हवेत जे शरद पवार यांच्या घरावर आंदोलन केलेल्या लोकांवर दाखल केले आहेत, असं राणा म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईमध्ये त्यांना जाहीर झालेल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी येणार आहेत. हा पुरस्कार स्वीकारणारे ते पहिलेच मानकरी आहेत. सायनच्या षण्मुखानंद सभागृहामध्ये हा सोहळा पार पडणार आहे.