Photo Credit- X

महाराष्ट्रात पुणे (Pune) हे सध्या गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चे केंद्रबिंदू समजले जात आहे. सध्या महाराष्ट्रात जीबीएस रुग्णांची संख्या 166 झाली आहे. मंगळवारी तीन नवीन रुग्ण आढळले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत 130 रुग्णांमध्ये जीबीएस आजाराची पुष्टी झाली आहे, तर इतर रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून आली आहेत. हा आजार नक्की कशामुळे वाढला याची कारणीमिमांसा आणि पडताळणी सुरु आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी नावाच्या जीवाणूमुळे हा प्रादुर्भाव झाल्याचे म्हटले आहे. विभागाचे म्हणणे आहे की, उपलब्ध पुरावे असे सूचित करतात की संसर्ग प्रामुख्याने पाण्याद्वारे पसरतो. आता पाण्याच्या गुणवत्तेच्या सर्वेक्षणात एक मोठा खुलासा समोर आला आहे.

पुण्यातील नांदेड गावात गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या वाढत्या प्रकरणांच्या तपासादरम्यान, पाण्याच्या नमुन्यांमध्ये क्लोरीनची कमतरता आढळली आहे. विशेषतः, 62 रुग्णांच्या घरांपैकी 26 घरांमधील पाण्यात क्लोरीनचे प्रमाण शून्य होते. मात्र, पाण्याच्या मूळ स्रोतांमध्ये (विहिरींमध्ये) क्लोरीनचे प्रमाण योग्य असल्याचे आढळले. यामुळे, पाणीपुरवठा व्यवस्थेत कुठेतरी क्लोरीनची पातळी कमी होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी निष्कर्ष काढला आहे की, या प्रकरणांमध्ये कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी या जीवाणूचा संसर्ग झाला आहे, जो दूषित पाण्यामुळे झाला असावा. या जीवाणूचा संसर्ग जीबीएसच्या वाढीशी संबंधित असल्याचे आढळले आहे.

नांदेड आणि सिंहगड रोड परिसरातील जीबीएस प्रकरणांच्या प्रादुर्भावाची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या रॅपिड रिस्पॉन्स टीम (आरआरटी) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नांदेडमध्ये 77 जीबीएस रुग्ण होते, त्यापैकी 62 रुग्णांच्या घरांना भेट देऊन पिण्याच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी, पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला घरगुती पाणीपुरवठ्यात किमान 0.2 ppm (पार्ट्स पर मिलियन) क्लोरीनची पातळी कायम ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे पाण्यातील जीवाणूंचा नाश होईल आणि सार्वजनिक आरोग्य सुरक्षित राहील. (हेही वाचा: Pune Guillain-Barré Syndrome: पुण्यात आता सीलबंद पाण्याचे कॅन आणि बाटल्याही सुरक्षित नाहीत; RO प्लांटमधील पाण्यात आढळले बॅक्टेरिया)

गेल्या आठवड्यात, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, पुण्यातील संशयित जीबीएस प्रकरणांपैकी 80% प्रकरणे नांदेडमधील एका मोठ्या विहिरीच्या आसपासच्या भागातून नोंदवली गेली आहेत. त्यांनी नमूद केले की, काही भागात मोठ्या संख्येने प्रकरणे संशयास्पद पाण्याच्या दूषिततेशी संबंधित असल्याचे दिसून आले. पीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नांदेडमधील विहिरीतील पाणी (जे चार ते पाच गावांना पाणीपुरवठा करते) पुरेसे क्लोरीन पातळीसह शुद्ध केले जाते. काही घरांमध्ये खाजगी टँकर किंवा ओव्हरहेड टँकद्वारे पुरवण्यात येणाऱ्या पाण्यात क्लोरीनची कमतरता होती. शिवाय, काही पाण्याच्या नमुन्यांमध्ये ई-कोलाय बॅक्टेरिया आढळून आले, त्यानंतर टँकर चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे.