Bala Nandgaonkar on Governor Bhagat Singh Koshyari: यापूर्वी महाराष्ट्रात असा प्रकार कधी दिसला नाही- बाळा नांदगावकर
Bala Nandgaonkar and Governor (Photo Credits: Twitter and PTI)

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत आज जो प्रकार घडलेला त्याचे राजकीय वर्तुळातून पडसाद उमटू लागले आहेत. महाविकासआघाडी सरकार आणि विरोधी पक्षांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. या घटनेचा निषेध करत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी 'जे काही घडले ते अत्यंत वाईट' आहे अशी प्रतिक्रिया ANI या वृत्तसंस्थेस दिली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या विमानास उड्डाण करण्याची परवानगी नाकारल्याचा प्रकार आज (गुरुवार, 11 फेब्रुवारी) पुढे आला. विमान उड्डाण करण्यास ऐनवेळी परवानगी नाकारल्याने राज्यपाल कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना विमानातून खाली उतरावे लागले.

"जे काही झाले ते खूप वाईट आहे. यापूर्वी महाराष्ट्रात असा प्रकार कधी दिसला नाही. राज्यपाल हे एक घटनात्मक पद आहे आणि त्यांचा आदर केलाच पाहिजे. त्याचबरोबर राज्यपालांनीही राज्याचा सन्मान केला पाहिजे. मुख्यमंत्री आणि सरकार ही महत्वाची पदे आहेत आणि त्यांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे" अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.हेदेखील वाचा-

दरम्यान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे या पदाचा मान राखला जायला हवा. राज्य सरकार हे राज्यपालांसोबत अहंकाराने वागत आहे. राज्य सरकार अहंकारी आहे. राज्य सरकारच्या वागण्यामुळे राज्याची प्रतिमा मलिन होते आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी म्हटले की, आम्ही राज्यपालांचा सन्मान करतो. त्यांना कोणत्या कारणास्तव परवानगी नाकारण्यात आली याबाबत माहिती घ्यायला हवी. त्यांचा अवमान होणार नाही. पण अनेकदा काही तांत्रिक कारणांमुळे विमानासाठी अनेकांना वाट पाहावी लागते.