खुशखबर! मुंबई-पुणे रेल्वे सेवा पुन्हा सुरु; मेटाकुटीला आलेल्या प्रवाशांनी सोडला सुटकेचा निश्वास
Mumbai-Pune Sinhagad Express | (Photo Credits: Wikipedia)

कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli) येथे आलेल्या महापूराचा फटका बसल्यामुळे बंद ठेवण्यात आलेली मुंबई-पुणे रेल्वेसेवा पुन्हा एकाद प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई-पुणे रेल्वे सेवा (Mumbai-Pune train services) आज (शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019) पासून सुरु झाली आहे. त्यामुळे या मार्गावर सेवा देणाऱ्या मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस ( Mumbai-Pune Sinhagad Express), मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस (Mumbai-Pune Deccan Express), मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस (Mumbai-Pune Indrayani Express) आणि मुंबई पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस (Mumbai Pune Intercity Express) या गाड्या आपल्या नियमीत वेळेनुसार धावतील. पुणे, कोल्हापूर, सांगली परिसरात आलेल्या महापुरामुळे रेल्वेमार्गावर पाणी साचल्याने या गाड्या 16 ऑगस्टपर्यंत पर्यंत बंद राहतील असे रेल्वेने जाहीर केले होते.

दरम्यान, महापुराचा फटका बसल्याने दीर्घ पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द केल्या होत्या. या गाड्या रद्द करताना मुंबई आणि पुणे विभागासह इतर ठिकाणी पावसामुळे निर्माण झालेल्या पूर स्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वेने स्पष्ट केले होते. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे अनेक प्रवाशांना फटका बसला होता. गाड्या दीर्घकाळ रद्द असल्यामुळे प्रवाशांची कोंटी झाली होती. पंरतू, पूरग्रस्तांच्या नातेवाईक, कुटुंबीयांपर्यंत त्यांच्या जवळच्या लोकांना पोहचता येत नव्हते. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठीही प्रशासनाला मोठे अडथळे येत होते. मात्र, आता पाऊस कमी झाल्याने आणि महापूराचे पाणी ओसरल्यानंतर गाड्या सुरु झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. (हेही वाचा, रेल्वे प्रवास करताना ओळखपत्र बाळगण्यापेक्षा mAadhaar ID चा वापर करा, कोणताच अडथळा येणार नाही)

मध्य रेल्वे ट्विट

जुलै महिन्यात यंदा पाऊस जोरदार पडला. त्यामुळे सांगली, कोल्हापूर या भागात मोठ्या प्रमाणावर पूर आला. त्यामुळे रेल्वे मार्गावर पाणी साचले. तर, कर्जत-लोनावळा यादरम्यान घाट परिसरात दरड कोसळल्याने रेल्वेमार्ग बंद झाला. त्यामुळे रेल्वे मार्गावर कोसळलेली दरड हटविणे आणि रेल्वेमार्गावरील पाणी ओसरेपर्यंत वाट पाहणे इतकेच काय ते प्रशासनाच्या हाती होते. दरम्यान, 26 जुलै ते 9 ऑगस्ट असा विशेष ब्लॉक घेत रेल्वे प्रशासनाने दरड हटविण्याचे काम केले. तसेच, इतरही तांत्रिक कामे पूर्ण केली.