Lake प्रतिकात्मक प्रतिमा | (Photo Credits: ANI)

Mumbai Lakes Water Level: मुंबईकरांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईत शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमधील तलावांची पातळी आता 93.17 टक्के झाली आहे. बीएमसी (BMC) ने यासंदर्भात आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, शुक्रवारी मुंबईला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये एकत्रित पाणीसाठा आता 13,48,449 दशलक्ष लिटर किंवा 93.17 टक्के इतका झाला आहे.

मुंबईतील संततधार पावसानंतरही तलावांची पातळी वाढली असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तलावांची पातळी खालीच आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक असलेला मोडक सागर तलाव 27 जुलै रोजी रात्री 10.52 वाजता ओसंडून वाहू लागला, असे नागरी संस्थेने सांगितले. यापूर्वी 20 जुलै रोजी शहर आणि उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे तुळशी तलाव ओसंडून वाहत होता. (हेही वाचा -Andheri Subway Shut Amid Waterlogging: मुंबई संततधार पाऊस, पाणी साचल्याने अंधेरी सबवे बंद)

मुंबईला तुळशी, तानसा, विहार, भातसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा येथून पाणीपुरवठा केला जातो. नागरी संस्थेने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, तानसा येथील पाण्याची पातळी 100 टक्के आहे. मोडक-सागर मध्ये 94.88 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. याशिवाय मध्य वैतरणा 98.59 टक्के, अप्पर वैतरणा 81.45 टक्के, भातसा 93.38 टक्के, विहार 100 टक्के आणि तुळशी 100 टक्के उपयुक्त पाणी पातळी उपलब्ध आहे.

दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शुक्रवारी मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. शुक्रवारसाठी, IMD ने मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. ज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि वादळाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.