Coronavirus (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस संसर्गाच्या भीतीच्या छायेत वावरणाऱ्या मुंबईकरांसाठी (Mumbaikar) एक आनंदाची बातमी आहे. मुंबई (Mumbai) शहरातील कोरोना व्हायरस रुग्णांच्या दुप्पटीचा वेग (Doubling Rate) आता 72 दिवसांवर पोहोचला आहे. तर संसर्गाच्या वाढीचा दर (Rate Of Infection Growth) हा 0.9 इतका म्हणजेच 1 टक्क्याच्याही खाली गेला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांचे उपचारानंतर बरे होण्याचे आणि रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) मिळण्याचे प्रमाणही 76 टक्क्यांवर पोहोचले आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ही माहिती ट्विटरद्वारे दिली.

मुंबईतील कोरोना व्हायरस रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज दिवसभरात 11643 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंतच्या चाचण्यांपौकी सर्वोच्च आकडा आहे. मुंबई आज दिवसभरात कोरना व्हायरस संक्रमित 1104 रुग्ण सापडले. आजची शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या (Positivity) 9.48 इतकी आढळली. पधरवड्यापूर्वी ती 24 टक्के इतकी होती. दरम्यान, शहरामध्ये आजघडीला 7178 इतके बेड रिक्त आहेत. तर 204 इतके अतिदक्षता विभाग रिक्त आहेत. (हेही वाचा, Coronavirus Cases In Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यातील आज सकाळी 71 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद)

दरम्यान, अत्यंत दाटीवाटीचा परिसर अशी ओळख असलेल्या धारावी परिसरातूनही दिलासादायक वृत्त आहे. धारावी परिसरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 2,545 इतकी झाली आहे. आज दिवसभरात या ठिकाणी केवळ 2 रुग्णच कोरोना संक्रमित सापडले आहेत. त्यामुळे धारावी आणि मुंबईकरांसाठी हा अत्यंत दिलासा मानला जात आहे.