हिंदू संस्कृतीमध्ये ‘दसऱ्या’ला (Dussehra 2021) विशेष महत्व आहे. हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक समजला जात असल्याने, कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात या दिवसापासून करतात. तसेच सोने-चांदी, नवीन वाहन, घर अशा गोष्टी घेण्यासही या दिवसाला प्राधान्य दिले जाते. नवरात्रीत सोन्याच्या किंमतीत (Gold Rate) कोणतीही लक्षणीय वाढ झाली नव्हती, परंतु नवरात्री संपताच सोन्याच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाली आहे. आज दसऱ्याच्या दिवशी सोन्याचा दर 500 हून अधिक रुपयांनी वाढला आहे.
Goodreturns वेबसाईट नुसार, सणासुदीच्या काळात मुंबई सराफा बाजारात, 15 ऑक्टोबर 2021 रोजी सोन्याची किंमत 24 कॅरेट सोन्यासाठी 47,970 रुपये 10 ग्रॅम इतकी आहे. सोबतच 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,970 रुपये 10 ग्रॅम इतकी आहे. त्याचबरोबर एक किलो चांदी आज 63,200 रुपयांना विकली जात आहे. चांदीच्या किंमतीमध्ये जवळजवळ 1100 रुपयांनी वाढ झाली आहे. महत्वाचे म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये चांदी 60 हजाराच्या घरात होती, अवघ्या काही दिवसांमध्ये यामध्ये 3 हजाराहून अधिक वाढ झाली आहे.
पुण्यात हे दर, 24 कॅरेट 1 तोळा सोन्यासाठी 49,350 तर 22 कॅरेट 1 तोळा सोन्यासाठी 47,800 इतके आहेत. पुण्यात आज चांदी 63,200 रुपये किलो या दराने विकली जात आहे. (हेही वाचा: विजयादशमी निमित्त खास मराठी Messages, Greetings, HD Images शेअर करून द्या शुभेच्छा; द्विगुणीत करा दसऱ्याचा आनंद)
हे वरील सोन्याचे व चांदीचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा. दसऱ्याच्या मुहूर्तावर तुम्हाला वैयक्तिक वापरासाठी सोने घ्यायचे असेल, तर 22 कॅरेट शुद्धतेचे सोने दागिने तयार करण्यासाठी उत्तम आहे. यामध्ये सोने, चांदी, निकेल आणि धातू वापरले जातात. इतर धातूंचे मिश्रण सोने अधिक कडक आणि दागिन्यांसाठी योग्य बनवते.
जर का तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर 24 कॅरेट सोने हा उत्तम पर्याय आहे. हे सोने शुद्ध स्वरूपाचे मानले जाते. शुद्ध सोने किंवा 24 कॅरेट सोने हे 99.9 टक्के शुद्धता दर्शवते. यामध्ये इतर कोणतेही धातू नसतात. 24 कॅरेट सोन्याचा वापर सोन्याची नाणी, बार इत्यादी करण्यासाठी केला जातो.