Gokul Milk | (Photo Credit - Gokul )

गोकुळ दूध दराच वाढ झाली आहे. गाय आणि म्हैशीच्या दूध खरेदी दरात गोकुळने वाढ केल्याने ही दरवाढ झाली आहे. अर्थात गोकुळच्या निर्णयामुळे दूध उत्पादकांना चांगला दिलासा मिळाला आहे. प्राप्त माहितीनुसार, गोकुळ दूध उत्पादक संघाने शुक्रवारपासून ही दरवाढ (Gokul Milk News) केली आहे. दिवाळी (Diwali Festival) सणाच्या पार्श्वभूमीवर देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दूधाची मागणी मोठ्या प्रमाणाव वाढली आहे. त्यामुळे गोकूळनेही दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना काहीशा चढ्या दराने (Milk Rates) दूध खरेदी करावे लागत असले तरी दूध उत्पादकांना मात्र चार पैसे वाढून मिळणार आहेत. फक्त आगोदरच महागाई आणि त्यातच दिवाळी आणि दिवाळीच्या तोंडावर झालेली ही दरवाढ ग्राहकांसह दूग्धजन्य पदार्थ बनविणाऱ्यांनाही त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

दूध उत्पादकांसाठी खरेदी दर (नवे)

म्हैशीचे दूध- प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ

गायीचे दूध- प्रति लिटर 3 रुपयांनी वाढ

नव्या दरानुसार आता म्हैशीचे दूध प्रति लिटर 47.50 पैसे तर गाईचे दूध प्रति लिटर 35 रुपये अशा वाढीव दराने खरेदी केले जाणार आहे. त्यामुळे दूध उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्राप्त माहितीनुसार गोकुळने पाठिमागच्या दीड वर्षांमध्ये दूध खरेदी दरात केलेली ही सहावी दर वाढ आहे.

दुसऱ्या बाजूला विविध शहरांमध्ये विक्रीसाठी उपसब्ध असलेले गोकुळ दूध दर काहीसे महागले आहे. म्हैशीचे दूध शहरांमध्ये प्रति लीटर 3 रुपये वाढीव दराने विकले जाईल. म्हणजेच आगोदर 60 रुपये दराने विकले जाणारे म्हैशीचे दूध आता 63 रुपये दराने विकले जाईल. (हेही वाचा, Gokul Election Results 2021: गोकुळ दूध संघ निवडणूक मतमोजणी; सतेज पाटील गटाची विजयी सुरुवात, सुजीत मिणचेकर, अमर पाटील विजयी, महाडिकांना धक्का)

दरम्यान, अमूल डेअरीनेही काही दिवसांपूर्वीच आपल्या दूध विक्री दरात मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. प्राप्त माहितीनुसार, अमुलने प्रति लिटर दोन रुपयांनी दूधाचे दर वाढवले आहेत. त्यामुळे पूर्ण क्रिमसह दुधाचा दर 61 वरुन 63 रुपये इतका झाला आहे. एका बाजूला वाढती महागाई आणि दुसऱ्या बाजूला जीवनावश्यक वस्तुंचे सातत्त्याने वाढणारे दर ही सर्वसामान्य ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.