Godrej Group Split: तब्बल 127 वर्षे जुना दिग्गज औद्योगिक समूह असलेल्या गोदरेज ग्रुपचे (Godrej Group) विभाजन झाले आहे. आदि आणि नादिर गोदरेज यांनी त्यांची चुलत भावंडे जमशेद आणि स्मितासोबत या विभाजनाला सहमती दर्शवली आहे. विभाजनानुसार, आदि आणि नादिर गोदरेजचा वाटा गोदरेज इंडस्ट्रीज (GIG) मध्ये आला आहे, ज्यामध्ये 5 सूचीबद्ध कंपन्यांचा समावेश आहे. तर त्यांचा चुलत भाऊ जमशेद आणि बहीण स्मिता यांना गोदरेज अँड बॉयस तसेच या संबंधित कंपन्या आणि लँड बँक मिळाली. याशिवाय मुंबईतील मौल्यवान मालमत्ताही त्यांच्या वाट्याला आली आहे.
निवेदनानुसार, एरोस्पेस आणि एव्हिएशन ते संरक्षण, फर्निचर, आयटी सॉफ्टवेअर अशा विस्तृत क्षेत्रात पसरलेल्या गोदरेज एंटरप्राइझ ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून जमशेद गोदरेज हा व्यवसाय सांभाळतील. तर त्यांची बहीण स्मिता यांची मुलगी न्यारिका होळकर यामध्ये कार्यकारी संचालक असतील. यामध्ये गोदरेज अँड बॉयस तसेच इतर संबंधित कंपन्यांचा समावेश आहे.
दुसरीकडे, नादिर गोदरेज हे गोदरेज उद्योग समूहाचे (GIG) अध्यक्ष असतील. हा गट आदि, नादिर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात असेल. या समूहात पाच सूचीबद्ध कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज ॲग्रोव्हेट आणि एस्टेक लाईफसायन्सेस यांचा समावेश आहे. निवेदनानुसार, आदि गोदरेज यांचा मुलगा पिरोजशा गोदरेज हे गोदरेज उद्योग समूहाचे कार्यकारी उपाध्यक्ष असतील आणि ते ऑगस्ट 2026 मध्ये अध्यक्षपदी नादिर गोदरेज यांची जागा घेतील. (हेही वाचा: Vegetables Rate Increased: गृहिणींचे बजेट कोलमडले, वाढत्या उष्णतेमुळे एपीएमसी मार्केटमध्ये आवक घटल्याने भाजीपाला महागला)
गोदरेज ग्रुपची स्थापना अर्देशीर गोदरेज यांनी 1897 मध्ये केली होती. त्यांचा कुलूप बनवण्याचा व्यवसाय होता, त्यापूर्वी हाताने वैद्यकीय उपकरणे बनवण्याच्या व्यवसायात ते अपयशी ठरले होते. अर्देशीरला मुलगा नव्हता, त्यामुळे त्यांचा व्यवसाय त्यांचा भाऊ पिरोजशा गोदरेज यांच्या हाती आला.
पिरोजशा गोदरेज यांना सोहराब, बुर्जोर आणि नवल असे तीन पुत्र व डोसा नावाची मुलगी होती. अनेक वर्षांनंतर, समूहाचा व्यवसाय बुर्जोर यांचे मुलगे आदि आणि नादिर तसेच नवलचा मुलगा आणि मुलगी जमशेद आणि स्मिता यांच्या हातात आला. सोहराबला मुलगा नव्हता, तर डोसाला एक मुलगा होता, रिशाद, ज्याला मूलबाळ नव्हते. आता 127 वर्षांनंतर समूहाच्या व्यवसायाची विभागणी होत आहे.