Goa Ironman Triathlon दरम्यान कोसळला 26 वर्षीय तरुण, दुसऱ्या दिवशी मृत्यू
Run | Representational image (Photo Credits: pxhere)

Goa News: गोवा येथे पार पडलेल्या ट्रायथलॉन एन्ड्युरन्स (Goa Ironman Triathlon) शर्यतीदरम्यान, कोसळल्यानंतर एका 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. कामाख्या सिद्धार्थ श्रीवास्तव असे त्याचे नाव आहे. तो मुळचा बंगळुरु येथील आहे. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. अधिक माहिती अशी की, कामाख्या सिद्धार्थ श्रीवास्तव हा येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत सहयोगी व्यवस्थापक म्हणून काम करत होता. त्याने गोव्यात आयर्नमॅन 70.3 मध्ये भाग घेतला. मात्र, अंतिम रेषेपासून अवघ्या 500 मीटर अंतरावर तो कोसळला.

तो कोसळल्याचे लक्षात येताच आपत्कालीन वैद्यकीय कर्मचार्‍यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांला रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने, एकाहून अधिक अवयव निकामी झाल्यामुळे सोमवारी तरुण तंत्रज्ञचा मृत्यू झाला, असे इंडियन एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

आयर्नमॅन 70.3 गोव्याच्या वैयक्तिक श्रेणीमध्ये, जी ट्रायथलॉन शर्यत आहे, त्यात 1.2-मैल पोहणे, 56-मैल सायकलिंग राइड आणि 13.1-मैल धावणे हे क्रीडा प्रकार समाविष्ठ आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी सकाळी 50 हून अधिक देशांतील स्पर्धकांना आकर्षित केलेल्या या शर्यतीला हिरवा झेंडा दाखवला.

दरम्यान, तंत्रज्ञाच्या मृत्यूबाबत अधिक माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी दुपारी अनेक अवयव निकामी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांनी अद्याप तक्रार दाखल केलेली नाही.

आयर्नमॅन 70.3 गोवाने त्यांच्या फेसबुक पेजवर दिलेल्या माहिती म्हटले आहे की, रविवारच्या ट्रायथलॉन दरम्यान शर्यतीत सहभागी झालेल्या व्यक्तीच्या निधनाची पुष्टी करताना आम्हाला दुःख होत आहे. शर्यतीच्या धावण्याच्या भागाच्या समाप्तीपासून अंदाजे 500 मीटर अंतरावर तो कोसळला. खेळाडूला वैद्यकीय मदतीची आवश्यकता होती. जी आपत्कालीन वैद्यकीय कर्मचारी आणि कार्यक्रमासाठी धावण्याच्या कोर्सवर तैनात असलेल्या रुग्णवाहिकद्वारे देण्यात आली. खेळाडूला जवळच्या रुग्णालयात नेण्यापूर्वी त्वरित वैद्यकीय सहाय्य आणि प्राथमिक उपाचर प्रदान करण्यात आले. मात्र रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. अॅथलीटला वैद्यकीय सहाय्य प्रदान करण्यासाठी ऑनसाइट सुरक्षा कर्मचारी आणि प्रथम प्रतिसादकर्त्यांच्या जलद कार्याचे आम्ही कौतुक करतो. अॅथलीटच्या कुटुंबियांना आणि मित्रांप्रती आमच्या मनःपूर्वक संवेदना आहेत, त्यांना आम्ही आमचा पाठिंबा देत राहू, असेही निवेदनात म्हटले आहे.

पोलीस अधीक्षक (उत्तर) निधी वलसन यांनी पीटीआयला सांगितले की, IRONMAN 70.3 दरम्यान रविवारी कोसळलेल्या कामाख्या सिद्धार्थचा सोमवारी एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थचे अनेक अवयव निकामी झाले. रविवारी दुपारी पणजीतील शर्यतीच्या शेवटच्या टप्प्यात सिद्धार्थ कोसळला, त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते.