सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 मधील तरतुदी शिथिल केल्यानंतरही समाजामध्ये अजूनही गे (Gay), लेस्बिअन, ट्रान्सजेन्डर लोकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला नाही. समाजामध्ये आपली नाचक्की होऊ नये म्हणून अनेक गे आणि लेस्बिअन लोक मनाविरुद्ध लग्न करतात व अनेकदा याची परिणती ते लग्न मोडण्यात होते. याच्याशीच निगडीत एक प्रकरण मुंबईमध्ये समोर आले आहे. लग्नानंतर आपला पती समलैंगिक असल्याची माहिती मिळाल्यानंतर एका महिलेने न्यायालयात धाव घेतली होती.
आता सत्र न्यायालयाने या 32 वर्षीय महिलेच्या बाजूने निकाल दिला आहे. निकाल देताना कौटुंबिक हिंसाचार हा केवळ शारीरिक अत्याचारापुरता मर्यादित नसून त्यात लैंगिक, शाब्दिक, भावनिक आणि आर्थिक शोषणाचाही समावेश असू शकतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. पत्नीचा आरोप होता की, सध्या वेगळा राहत असलेल्या पतीने लग्नाआधी तो गे असल्याची माहिती लपवली व लग्नानंतरही त्याचे इतर पुरुषांशी संबंध होते.
कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशावर शिक्कामोर्तब करत न्यायालयाने या पतीला आपल्या पत्नीला एक लाख रुपये आणि मासिक 15,000 रुपये भरपाई देण्याचे निर्देश दिले. पत्नीने पुरावा म्हणून काही छायाचित्रे सादर केली होती. पुराव्याचा संदर्भ देताना न्यायाधीश म्हणाले, ‘अर्जदाराला (पत्नी) प्रतिवादीच्या मोबाईलमध्ये इतर पुरुष व्यक्तींसह त्याची नग्न छायाचित्रे आढळली आहेत. यासह तिने काही आक्षेपार्ह कंटेंट असणारे स्क्रीन शॉट्स नमूद केले आहेत. लग्नानंतर अशी माहिती समोर आल्यानंतर खचितच पत्नीला मोठा मानसिक आघात बसला.’ (हेही वाचा: ब्रेकअपनंतर गे तरुणाची आत्महत्या; एका मुलीसाठी बॉयफ्रेंडने 3 वर्षांचे नाते तोडल्याचा आरोप)
न्यायमूर्ती पुढे म्हणाले की, पती आणि सासरच्या मंडळींकडून महिलेवर नक्कीच भावनिक आणि मानसिक अत्याचार केले जात होते. इथे घरगुती हिंसाचाराची वस्तुस्थिती बर्याच प्रमाणात सिद्ध झाली असून, त्यामुळेच अर्जदार आपल्या पतीपासून वेगळी राहत आहे. अर्जदाराने सध्या आपली नोकरी सोडली असून, तिची देखभाल करणे हे प्रतिवादीचे कर्तव्य आहे.’
जाणून घ्या प्रकरण-
माहितीनुसार, 2016 मध्ये या जोडप्याचे लग्न झाले होते. महिलेने 2018 मध्ये मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर तिचा पती आणि सासरच्या मंडळींच्या विरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. त्यावर नोव्हेंबर 2021 मध्ये, दंडाधिकारी न्यायालयाने पतीला आपल्या पत्नीला नुकसान भरपाईचे आदेश दिले. त्यामुळे संतप्त झालेल्या पतीने सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
महिलेने सांगितले की, तिने पतीच्या जवळ जाण्याचा खूप प्रयत्न केला मात्र पतीने तिला अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मार्च 2017 मध्ये, पती झोपेत असताना तिने त्याचा फोन तपासला असता, तो इतर पुरुषांशी सेक्स करत असल्याचे तिला दिसून आले व ते पाहून तिला धक्का बसला.