गौतमी पाटील (Gautami Patil) आणि वाद हे आता समीकरणच झाले आहे. गौतमी पाटील हिच्या अदा, तिने नाचताना केलेले हावभाव आणि तिच्या कार्यक्रमांना जमनारी गर्दी, हे सगळेच अनेकदा वादाचे कारण ठरते. पण गौतमी पाटील हिच्यावरुन आता पुण्यातील दोन राजकीय नेत्यांमध्ये जुंपली आहे. इतकेच नव्हे तर हे दोन्ही नेते पाटील आहेत. होय, एक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खेड येथील आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) आणि दुसरे आहेत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil). गौतमी पाटील हिच्यावरुन या दोन्ही नेत्यांमध्ये वाद होण्याचे नेमके कारण तरी काय? घ्या जाणून.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खेड येथील आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला होणाऱ्या गर्दीवरुन शिंदे गटाला डिवचले होते. मोहिते पाटील यांनी म्हटले होते की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला होणाऱ्या गर्दीपेक्षा अधिक गर्दी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना होते. (हेही वाचा, Gautami Patil: गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात सोलापूर पोलिसांची एण्ट्री, डिजे बंद; आयोजकांवर गुन्हाही दखल)
आमदार दिलीप मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया येताच त्याला शिंदे गटातील नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पलटवार केला आहे. मोहिते पाटील यांना प्रत्युत्तर देताना आढळराव पाटील यांनी म्हटले आहे की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची तुलना गौतमी पाटील हिच्यासोबत करणे चुकीचे आहे. ते खेड आमदार असलेले दिलीप मोहिते पाटील हे अज्ञानी आहेत त्यामुळे ते वेड्यांच्या नंदनवनात जगत आहेत.
राजकीय नेत्यांमधील आरोप प्रत्यारोप, टीकाटीप्पणी ही नेहमीच चालते. त्याला प्रसिद्धीही मिळते. गौतमी पाटील हिलाही प्रसिद्धी मिळते आहे. राजकीय नेत्यांची वक्यव्ये आणि गौतमी पाटील हिची प्रसिद्धी दोन्ही आपापल्या ठिकाणी आहेत. पण गौतमी पाटील हिच्यावरुन राजकीय नेत्यांमध्ये जुंपल्याचे पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.
गौतमी पाटील ही राज्यभरातील तरुणांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. तिच्या कार्यक्रमांना जोरदार प्रतिसाद लाभत असतो. लोक तिचे कार्यक्रम पाहण्यासाठी झाडांवर, घराच्या छतांवर चढताता. मिळेतल तिथून तिचा कार्यक्रम पाहतात. मोठी गर्दी करतात.