Gautam Navlakha | (Photo Credit: PTI)

पुणे पोलिसांनी (Pune Police) मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्याबाबत उच्च न्यायालयात बुधवारी (24 जुलै 2019) खळबळजनक दावा केला. गौतम नवलखा( Gautam Navlakha) हे ज्या नक्षलवादी संघटनेशी संबंधित आहे त्या संघटनेचे ‘हिजबुल मुजाहिदीन’ ( Hizbul Mujahideen) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे पुणे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच, नवलखा संबंधीत असलेली नक्षलवादी संघटना आणि हिजबुल मुजाहिदीन या संघटनांचा देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट होता असेही पुणे पोलिसांनी म्हटले आहे. पुणे पोलिसांच्या या दाव्यानंत एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, नक्षलवादी आणि सरकार यांच्यातील मध्यस्थ अशीच आपली भूमिका राहिली असल्याचा दावा गौतम नवलखा यांनी केला आहे. मात्र, नवलखा यांचा दावा म्हणजे केवळ धूळफेक असल्याचे पुणे पोलिसांनी म्हटले आहे. गौतम नवलखा यांच्यावर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप आहे.

दरम्यान, नवलखा यांनी या प्रकरणात अटकपूर्व जामिन मिळावा यासाठी न्यायालयाकडे याचिका अर्ज केला होता. त्यावर न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. या वेळी सरकारी वकील अरुणा पै यांनी युक्तिवाद करताना नवलखा आणि या प्रकरणातील सहआरोपींच्या लॅपटॉपमधून स्फोटक माहिती मिळाल्याचा दावा केला. गौतम नवलखा यांच्यासोबत रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग हे देखील या प्रकरणात सहआरोपी आहेत. (हेही वाचा, Koregaon Bhima case: आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का; याचिका फेटाळी)

पुणे पोलिसांनी उच्च न्यायालयात म्हटले आहे की, गौतम नवलखा हे ज्या नक्षलवादी संघटनांशी संबंधीत आहेत त्या संघटनेच्या नेत्यांचे ‘हिजबुल मुजाहिदीन’या दहशतवादी संघटनेच्या नेत्यांशी संबंध आहेत. ही संघटना आणि हिजबुल मुजाहिदीन या दोन संघटनांचे गेल्या अनेक वर्षांचे संबंध आहे. तर, गौतम नवलखा हे हिजबुल मुजाहिदीन संघटनेशी 2011 पासून संपर्कात आहेत. तसेच, नवलखा यांनीही हिजबुल मुजाहिदीन संघटनेच्या नेत्यांची भेट घेतल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे.