Dancing in Uniform: 'गणवेशात नाचणे अनादरकारक आणि अस्वीकार्य'; गणेशोत्सवादरम्यान वर्दीमध्ये न नाचण्याचा पोलिसांना इशारा
Police | (File Photo)

नुकताच देशभरात गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी गणपती विसर्जनाच्या दिवशी नागरिकांच्या सोबत अनेक खाकी वर्दीमधील कर्मचारीही थिरकताना दिसले. आता अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंत सरंगल यांनी पोलिसांना गणवेशात नाचू नका, असा इशारा दिला आहे. या कृतीला त्यांनी ‘अनादर’ म्हटले आहे. गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्रभरातील पोलिसांच्या वर्दीमध्ये नाचतानाच्या 50 हून अधिक क्लिप सोशल मीडियावर समोर आल्या आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये माटुंगा येथील जीएसबी सेवा मंडळात महिलांसह डझनभर खाकी कपडे घातलेले अधिकारी नाचताना दिसल्यानंतर, मुंबई पोलिसांच्या डीसीपी झोन 4 यांनी विभागीय चौकशी सुरू केली आहे.

झोन 4 चे पोलीस उपायुक्त संजय पाटील यांच्यामते त्यांनी विभागाकडे अहवाल सादर केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओंपैकी एक म्हणजे दोन पोलीस लालबाग येथे उत्सव साजरा करणाऱ्यांच्या खांद्यावर बसलेले दिसले आहेत. दुसऱ्यामध्ये 50 हून अधिक कोल्हापूर पोलीस बंदोबस्तावर असताना एका ट्रॅकवर जोमाने नाचताना दिसतात. सरंगल यांनी मिड-डेला सांगितले की, ‘पोलीस अधिकाऱ्यांनी गणवेशात नाचू नये आणि त्यांना तसे करण्याची परवानगी नाही. या प्रकरणाची राज्यभर विभागीय चौकशी सुरू आहे.’

एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘गणवेशात नाचणे अनादरकारक आणि अस्वीकार्य आहे’. जीएसबी सेवा मंडळाचे प्रवक्ते विजय कामथ यांनी सांगितले की, ही घटना रस्त्यावर नव्हे तर गणपती मंडळाच्या आत घडली असल्याने त्याबाबत सौम्यता दाखवली पाहिजे. ते पुढे म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षांपासून, कोविड-19 मुळे देशभरात कोणीही सण साजरा केला नाही, परंतु यावर्षी सर्व सण थाटामाटात साजरे करण्यात आले.’ (हेही वाचा: Aaditya Thackeray यांना Z Security पण रत्नागिरी दौर्‍यात सुरक्षा रक्षकांना खाजगी वाहन; सुरक्षा व्यवस्थेत तडजोडीची चर्चा)

‘शेवटच्या दिवशी विसर्जनाच्या काही वेळापूर्वी आमच्या मंडळात ढोल-ताशा उत्सव झाला. तेव्हा आमच्या स्वयंसेवकांनी गेल्या पाच दिवसांपासून ड्युटीवर असलेल्या सर्व पोलिसांना त्यांच्यासोबत नाचण्याची विनंती केली. ही पोलिसांची चूक नव्हती आणि यात काहीही चूक नाही कारण ते रस्त्यावर नाचत नव्हते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, मंडळाने सीपी आणि डीसीपी यांना पत्र लिहिले आणि त्यांना पोलिसांवर कारवाई न करण्यास सांगितले. त्यांनी या विसर्जनात उत्कृष्ट काम केले आहे. ते देखील मानव आहेत आणि आमच्यासोबत पाच मिनिटे नाचणे हा काही गुन्हा नाही.’