Bombay High Court | (Photo Credits: ANI)

Molestation Case In KEM Hospital: मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) केईएम रुग्णालयातील (KEM Hospital) एका वरिष्ठ डॉक्टरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला (Anticipatory Bail Application) आहे. या डॉक्टरवर 6 महिला ज्युनियर डॉक्टरांचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटले की, पीडितांना झालेल्या 'भावनिक आणि मानसिक आघात' लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. 8 मे रोजी, उच्च न्यायालयाने केईएम रुग्णालयातील फॉरेन्सिक मेडिसिन विभागातील अतिरिक्त प्राध्यापक डॉ. रवींद्र देवकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या पीडितांनी देवकर यांनी त्यांना अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने म्हटले की, देवकर हे त्यांच्या प्रभावशाली पदाचा फायदा घेत बऱ्याच काळापासून चुकीचे वर्तन करत होते. न्यायालयाने असे नमूद केले की, आतापर्यंत कोणीही वरिष्ठ डॉक्टरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यास तयार नव्हते. कारण पीडितांना मानसिक धक्का बसला होता. तसेच त्यांना त्यांच्या करिअरवर परिणाम होण्याची भीती होती. जर देवकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला तर ते सर्व तक्रारदार पीडितांवर सूड उगवण्याची शक्यता आहे आणि अशा कृत्यांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता देखील आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे.

तथापि, न्यायालयाने म्हटले आहे की, 'रुग्णालयासारख्या कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षितता आणि नैतिक आणि कायदेशीर प्रतिष्ठा जपण्यासाठी ही अटकपूर्व जामीन याचिका फेटाळणे आवश्यक आहे. देवकर यांच्याविरुद्ध भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवकर यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे की, त्यांच्याविरुद्धची तक्रार ही वैयक्तिक द्वेष आणि रुग्णालयाच्या अंतर्गत राजकारणाचा परिणाम आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले की देवकर हे कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ प्रतिबंधक (संरक्षण, मनाई आणि निवारण) कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या रुग्णालयाच्या अंतर्गत समितीचे सदस्य देखील होते.

देवकर यांच्याविरुद्ध अशी तक्रार येण्याची ही पहिलीच वेळ नाही, असंही यावेळी न्यायालयाने म्हटलं. 2021 मध्येही एका महिला डॉक्टरने त्यांच्याविरुद्ध अशीच तक्रार दाखल केली होती. न्यायमूर्ती पाटील यांनी नमूद केले की, त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. डॉक्टरांव्यतिरिक्त, आता वैद्यकीय विद्यार्थीही देवकर यांच्याविरुद्ध गैरवर्तनाच्या तक्रारी घेऊन पोलिसांकडे येत असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.