Ganeshotsav 2022: खुशखबर! यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाण्यासाठी मोफत बससेवा; जाणून घ्या सविस्तर
Lord Ganesha | (Photo Credits: Pixabay)

नवी मुंबईतील (New Mumbai) महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांनी नागरिकांना गाजरे दाखवण्यास सुरुवार केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या (BJP) ऐरोली युनिटने गणेशोत्सवादरम्यान (Ganeshotsav 2022) कोकणात मोफत वाहतूक सेवा देण्याची ऑफर दिली आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील लोक मोठ्या संख्येने कोकणात जाऊन हा उत्सव साजरा करतात. भाजपचे स्थानिक नेते राहुल शिंदे यांनी कोकणात जाणाऱ्या लोकांना पक्ष कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

‘गणेशोत्सवादरम्यान, कोकणात जाणाऱ्या कोणत्याही ट्रेनमध्ये बर्थ उपलब्ध नसतात आणि राज्य परिवहनच्या बसेसही भरलेल्या असतात, म्हणूनच ऐरोली भाजप जनतेला कोकणासाठी ऐरोलीतील सेक्टर 19 आणि 20 मधून मोफत बससेवा उपलब्ध करून देईल,’ असे शिंदे म्हणाले. त्यांच्या म्हणण्यानुसार, ऐरोली येथून 27 ऑगस्ट रोजी बसेस सुटतील आणि मोफत जागा बुक करण्याची तारीख 21 ऑगस्ट आहे.

कोकणात गणेशोत्सवासाठी पुण्या-मुंबईहून जाणाऱ्या लोकांच्या वाहनांची टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. कोकणात जाताना महामार्गावरील विविध टोल नाक्यांवर टोल द्यावा लागणार नाही, पण यासाठी स्थानिक प्रशासनाकडून परवाना असणारे स्टीकर घ्यावे लागणार आहेत. सुमारे दहा हजारांहून अधिक वाहनांना टोल सवलतीचा फायदा होईल. (हेही वाचा: कोकणवासियांचा प्रवास होणार सुकर; सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची विधानसभेत दिली 3 महत्त्वाची आश्वासनं)

यासह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोकणातील मुंबई-गोवा महामार्ग NH-66, तसेच पश्चिम विभागातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर गणपती उत्सवादरम्यान सुरळीत आणि सोयीस्कर वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश महाराष्ट्रातील PWD आणि MoRTH च्या अधिका-यांना दिले आहेत. दरम्यान, यंदा गणेश चतुर्थी म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी 30 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजून 34 मिनिटांनी सुरू होईल व 31 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजून 23 मिनिटांनी समाप्त होईल.