Rainfall | (Image used for representational purpose only) | (Photo Credits: pixabay)

Ganeshotsav 2019: गेले प्रदीर्घ काळ विश्रांतीवर गेलेला पाऊस गणेशोत्सव (Ganeshotsav 2019) काळात पुन्हा एकदा हजेरी लावण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभाग (Indian Meteorological Department) म्हणतो की, गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) म्हणजेच 2 सप्टेंबर नंतर एका दिवसाने म्हणजेच 3 सप्टेंबरपासून मुंबई (Mumbai) आणि मुंबई उपनगर (Mumbai Suburb) तसेच, उर्वरीत महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाची पर्जन्यवृष्टी होऊ शकते. गेला आठवडा वगळता ऑगस्ट महिन्यात पावसाची उपस्थिती तुरळकच राहिली आहे. या महिन्यात पडलेल्या पावसाची नोंद 555 मिमी इतकी करण्यात आली आहे. जी ऑगस्ट महिन्यात पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत बरीच कमी आहे.

भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे की, महाराष्ट्रासोबतच मध्य भारतातील काही भागातही सप्टेंबर महिन्यात हलका ते मध्य पाऊस पडे. दरम्यान, जुलै महिन्यात मुंबई आणि उपनगरात 1 आणि 2 जुलै मध्ये 375 मिमी पावसाची नोंद झाली. तर, 3-5 ऑगस्ट या काळात 337.9 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाची कोसळधार पाहायला मिळाली.

कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकणात 28 ते 30 ऑगस्ट या काळात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. या काळात सिंधुदुर्गमध्ये जोरदार पाऊस होईल. तर, रायगड आणि रत्नागिरीला मात्र 29 ऑगस्ट रोजी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, मध्य महाराष्ट्रात धुळे, जळगाव येथे मंगळवारी (27 ऑगस्ट) रोजी पावसाची शक्यता आहे. (हेही वाचा, Ganeshotsav 2019: घरीच बनवा Eco Friendly Ganpati ; जाणून घ्या खास पद्धत (व्हिडिओ))

दरम्यान, 29 ते 31 ऑगस्ट या काळात विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर आदी ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यासोबतच मराठवाड्यातही पुढील काही दिवसात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पावसाळ्यात आलेल्या पावसाने अचानकच दडी मारील. त्यामुळे पुन्हा एकदा पावसाची प्रतिक्षा केली जात आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर, महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना आनंदच होणार आहे.