महाराष्ट्रात सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे अशातच कोरोनाच्या तिसर्या लाटेचा धोका असल्याने गणेशोत्सव (Ganeshhotsav) देखील साध्या आणि सुरक्षित वातावरणामध्ये साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकार कडून करण्यात आले आहे. आगामी गणेशोत्सवामध्ये गणेशमूर्तींचं विसर्जन करताना गर्दीचा धोका टाळण्यासाठी आता पालिकेकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेने नागरिकांना गणेश विसर्जनासाठी ऑनलाईन स्लॉटबुकिंग करण्याचं आवाहन केले आहे. त्यासाठी नागरिकांना ganeshvisarjan.covidthane.org या संकेतस्थळावर जाऊन स्लॉट बूक करायचा आहे. हे स्लॉट बुकिंग 1 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे.
कोविड च्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी नागरिकांनी ऑनलाईन स्लॉट बुकिंगला उत्तम प्रतिसाद दिला होता. त्याचप्रमाणे यावर्षी देखील ठाणे महानगरपालिकेकडून शहरात 40 ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. 13 कृत्रिम तलावं आणि 20 स्विकृती केंद्र यावेळी उपलब्ध राहतील. इथे पहा तुमच्या विभागामध्ये कोणते केंद्र, तलाव उपलब्ध आहे?
11,14,16 आणि 19 सप्टेंबर या दिवशी यंदा गणेश विसर्जन होणार आहे. विसर्जनाच्या दिवशी दुपारी 2.30 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत प्रत्येक विसर्जन स्थळी 20 मिनिटांसाठी 21 स्लॉट्स खुले केले जाणार आहेत. प्रथम येणार्यास प्राधान्य या तत्त्वावर हे स्लॉट्स वितरित होणार आहेत. विसर्जनाच्या आधी 30 मिनिटं नागरिकांना स्थळी पोहचावं लागणार आहे. यासोबतच मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम देखील नागरिकांना पाळावे लागणार आहेत.
दरम्यान महाराष्ट्रात गणेशोत्सव घरगुती आणि सार्वजनिक स्वरूपात मोठ्या उत्सहात साजरा होतो. पण यंदा सलग दुसर्या वर्षी कोरोनाचं थैमान पाहता आता हा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकार, केंद्र सरकार, आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. गणेशमुर्तीच्या उंची वर देखील यंदा बंधनं कायम आहेत.