महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोनाबाधित रुग्णांची (Coronavirus) वाढणारी संख्या चिंताजनक आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यातील विविध शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याचपार्श्वभूमीवर पुण्यातही (Pune) कोरोना उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुण्यातील दगडूशेठ हलवाई ट्रस्ट आणि देव देवेश्वर संस्थांनचे गणेश मंदिर येत्या 31 मार्चला बंदच राहणार आहेत. यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भक्तांना मंदिरात प्रवेश करता येणार नाही. संकष्टी, अंगारकीच्या दिवशी मोठ्या संख्येत भाविक या मंदिरात येत असतात. त्यामुळे मोठी गर्दी होते. कोरोना प्रादुर्भाव पाहता खबरदारी म्हणून बुधवारी मंदिर बंद राहणार आहे.
महत्वाचे म्हणजे, दगडूशेठ मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार असून केवळ ब्रम्हवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी पार पडणार आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गणेश भक्तांनी ऑनलाईन दर्शन घ्यावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी केले आहे. याचबरोबर सारसबाग येथील सिद्धिविनायक मंदिर,पौड फाटा येथील दशभुजा मंदिर, लक्ष्मी नगरमधील रमणा मंदिर ही सर्व मंदिरे बुधवारी चतुर्थी दिवशी बंद ठेवण्यात येणार आहे, असे देव देवश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त सुधीर पंडित यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Maharashtra COVID-19 Guidelines: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोविड 19 संसर्ग थोपवण्यासाठी नवे निर्देश जारी; हॉटेल्स, मल्टिप्लेक्स 8 नंतर बंद ते होम आयसोलेशन साठी नियमावली जारी
पुण्यात आज तब्बल 8 हजार 292 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 42 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 5 लाख 14 हजार 639 वर पोहचली आहे. यापैकी 4 लाख 45 हजार 942 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, आतापर्यंत एकूण 9 हजार 842 जणांचा मृत्यू झाला आहे.