वाढत्या प्रदूषणामुळे काळी पडलेली डोंबिवली येथील दावडीचा राजा गणेश मूर्ती

डोंबिवली: वाढते प्रदूषण हा एक चिंतेचा विषय. इतका की, यंदा प्रदूषणाचा थेट फटका डोंबिवलीतील बाप्पांनाही बसला आहे. आजवर जल, वायू प्रदूषणाने नागरिकांना त्रस्त केले होते. पण, आता चक्क गणपती बाप्पांनाही प्रदूषणाचा फटका बसल्याचे दिसते. हा प्रकार घडला आहे येथील दावडीचा राजाच्या मूर्तीसोबत. गेले पाच दिवस या मूर्तीचा रंग बदलत असून, ती काळी पडल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे या मूर्तीची प्रतिष्ठापणा करणारे मंडळही हैराण झाले असून, भक्तांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

दावडी गावातील तुकाराम चौक हे एक लगबगीचे ठिकाण. येथील ओम साई मित्र मंडळ चौकात दावडीचा राजा गणपतीची प्रतिष्ठापणा करते. गेली ११ वर्षे इथे गणपतीची प्रतिष्ठापणा सुरु आहे. सालाबादप्रमाणे यंदाही बाप्पांची प्रतिष्ठापणा करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष दिनेश यादव प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही दावडीचा राजाची मोठी मूर्ती आणि पूजन करण्यासाठी एक छोटी मूर्ती मंडळाच्या वतीने दहा सप्टेंबरला आणली. पहिले काही काळ मूर्तीवरचे प्लॅस्टिकचे आवरण आम्ही काढले नाही. पण, पूजेसाठी आवरण काढून मूर्ती आम्ही खूली केली. त्यानंर अल्पावधीतच एक वेगळा प्रकार पहायला मिळाल. मूर्तीचा रंग बदलत होता. मूळ रंगाऐवजी मूर्ती काळी पडत होती.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पहिल्याच दिवसापासून मोठी आणि छोटी अशा दोन्ही मूर्ती काळ्या पडताना दिसत होत्या. आता सहाव्या दिवशी तर हा काळसरपणा अधिकच वाढला आहे. थेट बाप्पांनाही प्रदूषणाचा फटका बसल्याने डोंबिवली परिसरात प्रदूषणाचा प्रश्न किती गंभीर झाला आहे, याकडे लक्ष वेधले आहे.