FYJC Online Admission Process: अकरावी प्रवेशासाठी होणाऱ्या CET परीक्षेसाठी 19 जुलैपासून ऑनलाईन नोंदणीला सुरुवात
Representational Image (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र राज्य बोर्डाचा (Maharashtra State Board) निकाल कालच जाहीर झाला. त्यानंतर आता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची एकच धांदल उडेल. यंदा परीक्षा न होता अंतर्गत मुल्यमापन पद्धतीने गुण देण्यात आल्याने अकरावी प्रवेशासाठी सीईटी (CET) घेतली जाणार आहे. त्यासाठी 19 जुलैपासून नोंदणीला सुरुवात होणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाहीत. (11th Std CET Format: 11 वी प्रवेशासाठी सीईटी परिक्षेचा पॅटर्न जाहीर, जाणून Exam बद्दल अधिक माहिती)

कशी असेल CET परीक्षा?

यंदा अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येणार असून त्यात दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारण्यात येतील. ही परीक्षा एकूण 100 गुणांची असून त्यासाठी 2 तासांचा अवधी देण्यात येईल. परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न असतील आणि ही परीक्षा ओएमआर पद्धतीने होईल. सीईटी परीक्षेच्या गुणांच्या आधारे महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येईल. विशेष म्हणजे ही परीक्षा ऑप्शनल असल्याने सीईटी दिलेल्यांना प्रवेशप्रक्रियेत प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर रिक्त जागांवर प्रवेश दिला जाईल. परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे मुल्यमापन दहावीच्या गुणांच्या आधारे होईल.

दरम्यान, राज्याचा दहावीचा निकाल 99.95 टक्के लागला आहे. तर कोकण विभागाचा 100 टक्के निकाल लागला आहे. यंदा दहावीच्या परीक्षेला 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी  9 लाख 09 हजार 931 मुलं तर 7 लाख 48 हजार 693 इतक्या मुली होत्या. यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अंतर्गत मुल्यमापन पद्धतीने त्यांना गुण देण्यात आले.