Sanjay Pandey | (Photo Credits: Twitter/ANI)

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी आगामी विधानसभा निवडणूक (Assembly Polls) लढणार असल्याची माहिती दिली आहे. पांडे हे निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी वर्सोवा (Versova) मधून निवडणूक लढण्याचा मानस व्यक्त केला आहे. अनेक काळापासून ते सक्रिय राजकारणामध्ये येण्यासाठी उत्सुक होते. पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी लोकसभा निवडणूकीमध्येही तसा प्रयत्न केला होता पण तेव्हा हे होऊ शकले नाही पण आता विधानसभा निवडणूक लढण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

पांडे लोकसभेला मुंबईत उत्तर पश्चिम मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढणार होते. लोकांचा त्यासाठी आग्रह होता असेही त्यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या पांडे यांना जून 2022 मध्ये केंद्रीय एजन्सींनी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) फोन टॅपिंग प्रकरणी अटक केली होती. मुंबईचे पोलीस आयुक्त असताना ठाकरे मविआ च्या सरकारमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

18 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त झालेले पांडे त्याच वर्षी 30 जून रोजी सेवेतून निवृत्त झाले. IIT-कानपूरचे माजी विद्यार्थी आणि 1986 बॅचचे IPS अधिकारी होते. पांडे यांना NSE फोन टॅपिंग प्रकरणाच्या संदर्भात ED आणि CBI यांनी जुलै आणि सप्टेंबर 2022 मध्ये अटक केली होती. अटकेनंतर त्यांनी जवळपास पाच महिने तुरुंगात काढले.

दिल्ली उच्च न्यायालयाने 8 डिसेंबर 2022 रोजी त्यांना ईडीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला. पांडेंना जामीन मंजूर करताना, उच्च न्यायालयाने सांगितले की जरी सीबीआयने पांडे यांच्यावर फसवणूक, criminal breach of trust आणि लाचखोरीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला असला तरी या गुन्ह्यांपैकी कोणतेही घटक या प्रकरणात सापडले नाहीत. कोणीही लाच मागितल्याचा किंवा स्वीकारल्याचा आरोप नसल्यामुळे या प्रकरणात लाचखोरीचे आरोप लागू झाले नाहीत.