Raju Todsam | (File Photo)

माजी आमदार राजू तोडसाम ( Former MLA Raju Todsam) यांची रवानगी थेट यवतमाळ कारागृहात झाली आहे. महावितरण लेखापालाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणीच्या खटल्यात राजू तोडसाम (Raju Todsam) यांना ही शिक्षा झाली आहे. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने 2015 मध्ये तोडसाम यांना तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाच्या या निर्णयास तोडसाम यांनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली. सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर माजी आमदार राजू तोडसाम यांची रवानगी थेट यवतमाळ कारागृहात करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

तत्कालीन आमदार राजू तोडसाम यांच्याकडे काही लोकांनी आपल्याला विजेचं बिल वाढीव आल्याची तक्रार केली होती. त्यासाठी राजू तोडसाम आणि त्यांचे समर्थक 17 डिसेंबर 2013 या दिवशी पांढरकवडा इथल्या वीज वितरण कार्यालयात गेले. तेथे त्यांचा आणि कार्यालयातील लेखापाल यांच्याशी काही शांब्दिक वाद झाला. या वेळी तोडसाम यांनी आपल्याला मारहाण आणि शिवगाळ केली अशी तक्रार लेखपाल यांनी पोलिसात दिली होती. लेखपालांकडून प्राप्त तक्रारीवरुन पांढरकवडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. (हेही वाचा, महाराष्ट्र: पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे प्रकरण Yashomati Thakur यांच्या अंगलट, सुनावली तीन महिन्यांची शिक्षा)

शिवीगाळ आणि मारहाण प्रकरण पुढे कनिष्ठ न्यायालयात गेले. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकूण घेत राजू तोडसाम यांना दोषी ठरवत तीन महिने तुरुंगवास आणि 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्यांचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयाला तोडसाम यांच्याकडून जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले.

दरम्यान, तोडसाम यांच्या याचिकेवर जिल्हा सत्र न्यायालयालयाने गुरुवारी (21 जानेवारी 2021) तीन वर्षांनी निकाल दिला. न्यायाधीश पी. बी. नाईकवाड यांनी कनिष्ठ न्यायालयाचा आदेश कायम ठेवली. न्यायालयाच्या निर्णयानंतर राजू तोडसाम यांची रवानगी थेट यवतमाळ कारागृहात करण्यात आली.