केंद्राला 40 हजार कोटी परत केल्याबाबत, देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळले अनंत हेगडेंचे आरोप; 'असे पैसे परत करता येत नाहीत'
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Photo Credit : ANI)

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्ता स्थापनेची बोलणी करत असताना, अचानक देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर भाजप बहुमत सिद्ध न करू शकल्याने फडणवीसांना राजीनामा द्यावला लागला होता. मात्र आपल्याकडे आमदारांचे पाठबळ नाही हे माहित असूनही फडणवीस मुख्यमंत्री का झाले? या प्रश्नांचे उत्तर देताना भाजपचे खासदार अनंत हेडगे (Ananth K Hegde) यांनी, केंद्राला 40 हजार कोटी परत करण्यासाठी देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले असा दावा केला आहे. आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व दावे फेटाळून लावत हा आरोप चुकीचे असल्याचे सांगितले आहे.

याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणतात, ’80 तासांचा मुख्यमंत्री असताना मी फक्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांसाठी 5 हजार कोटी मंजूर करण्यात आले होते. मात्र हेगडे यांनी कोणत्याही पुराव्यानिशी केलेले आरोप पूर्णतः चुकीचे आहेत. केंद्र सरकारकडून असे पैसे दिले जात नाहीत आणि राज्य सरकार असे पैसे परत करू शकत नाही.’

ते पुढे म्हणतात, ‘बुलेट ट्रेन असो वा इतर कोणत्या योजना असो, अशांसाठी केंद्राने महाराष्ट्राला मदत दिली नाही आणि महाराष्ट्राने कोणतेही पैसे परत केले नाहीत. सरकारच्या वित्त विभागाने याची चौकशी करून सत्य काय आहे ते जनतेसमोर आणावे.’

(हेही वाचा: भाजपा खासदार अनंत कुमार हेडगे यांचा खळबळजनक दावा; देवेंद्र फडणवीस यांचं 80 तासाचे सरकार केंद्राचे 40 हजार कोटी वाचवण्यासाठी)

मात्र या बाबत सत्ताधारी पक्ष अतिशय खवळला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्वीट करत, हेगडे यांचा दावा खरा असेल तर देवेंद्र यांनी महाराष्ट्राशी गद्दारी केल्याचे मत व्यक्त केले आहे. तर जितेंद्र आव्हाडांनी ‘महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही' असे सांगितले आहे.