वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत राहणारे भाजपा नेते, खासदार अनंत हेडगे (BJP leader Ananth K Hegde) यांनी आता महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या 80 तासांच्या सरकारबद्दल केलेल्या विधानामुळे पुन्हा राजकीय क्षेत्रातील खळबळ उडाली आहे. अनंत हेडगे यांनी केलेल्या दाव्यानुसार महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्थापन केलेल्या 80 तासांच्या सरकारमागे केंद्राचे 40 हजार कोटी रूपये वाचवणे हा उद्देश असल्याचं सांगण्यात आलं आहे. भाजपाकडे बहुमत नसतानाही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर एनसीपीच्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र यामागे शिवसेना, एनसीपी आणि कॉंग्रेस यांचाकडून होणार्या 40 हजार कोटी रूपयांचा अपव्यय टाळणं हा हेतू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेडगेंचे आरोप फेटाळून लावले आहेत. सरकार स्थापन केल्यानंतर केवळ 5 हजार कोटींचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया त्यांनी मीडीयाशी बोलताना दिली आहे.
मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी 40 हजार कोटी रूपयांची योग्य ठिकाणी म्हणजे केंद्र सरकारकडे पोहचते केल्याचे हेडगे यांनी म्हटले आहे. दरम्यान शिवसेना, कॉंग्रेस, एनसीपी कडून त्याचा दुरूपयोग होऊ नये म्हणून ही राजकीय खेळी रचल्याचा दावा अनंत हेडगे यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता जाताच महाविकासआघाडी सरकारवर केलेल्या टीकेतील महत्त्वाचे मुद्दे.
अनंत हेडगे हे भाजपाचे उत्तर कन्नड मतदार संघाचे खासदार आहेत. पहिल्या मोदी सरकारमध्ये ते दीड वर्ष राज्यमंत्री होते. तसेच वारंवार ते वादग्रस्त विधानांमुळेही चर्चेमध्ये आले आहेत. टिपू सुल्तान, ताजमहल यांच्यापासून अगदी राहुल गांधी आणि मुस्लिम विरोधी भूमिकेमुळे ते सतत चर्चेमध्ये होते.
ANI Tweet
BJP leader Ananth K Hegde in Uttara Kannada yesterday: You all know our man in Maharashtra became CM for 80 hours. Then, Fadnavis resigned. Why did he do this drama? Didn't we know that we don't have majority and yet he became CM. This is the question everyone is asking. pic.twitter.com/DsWKV2uJjs
— ANI (@ANI) December 2, 2019
महाराष्ट्रात 23 ऑक्टोबरच्या सकाळी अचानक भाजपाने एनसीपीच्या अजित पवारांसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री तर अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून राजभवनात छोटेखानी कार्यक्रमात शपथविधी पार पडला. मात्र 80 तासांतच अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पद सोडल्याने अल्पमतात आलेल्या भाजपाने बहुमत ठरावाचा सामना करण्याऐवजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेना, कॉंग्रेस आणि एनसीपीने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून निवडले.