माजी मुख्यमंत्र्यांचे काय करायचे? अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या जबाबदारीवरुन काँग्रेस पक्षात दिल्ली दरबारी खल
Former Chief Minister Ashok Chavan, Prithviraj Chavan | (Photo credit: Archived, edited, symbolic image )

महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi Government) सरकारमध्ये कोणत्या नेत्याला कोणते मंत्रिपद द्यायचे हे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये जवळपास नक्की झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मंत्रिमंडळ (Cabinet of Chief Minister Uddhav Thackeray) विस्तारात ठरल्याप्रमाणे खातेवाटप होईल. त्यामुळे तिन्ही पक्षांतील पद आणि जबाबदारी वाटपाचा तिढा बऱ्याच प्रमाणत सुटला असे चित्र असले तरी माजी मुख्यमंत्र्यांचे नेमके करायचे काय? हा गुंता मात्र राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला अद्याप सोडवता आला नाही. त्यामुळे अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) या दोन माजी मुख्यमंत्र्यांवर कोणती जबाबदारी द्यायची यावर काँग्रेस पक्षात दिल्ली दरबारी बराच खल सुरु असल्याचे समजते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या शपथविधीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे प्रदीर्घ काळ सत्ताविरह सहन केलेल्या काँग्रेसला संघटनात्मक बांधणीसाठी पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष नेमणे आवश्यक आहे. त्यामुळे या पदाची जबाबदारी कोणावर सोपवावी या विचारात काँग्रेस आहे.

दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या महाविकास आघाडी सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विस्तारात काँग्रेसच्या विविध नेत्यांकडे मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाईल. मात्र, ही जबाबदारी सोपवताना मंत्रिमंडळात केवळ एखादा मंत्री म्हणून काम करण्यास पृथ्वीराज चव्हाण फारसे इच्छुक नसल्याचे सूत्रांचे म्हणने आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी या आधी महाराष्ट्रात थेट मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे ते मंत्रिपदास अनुत्सुक असल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद सोपवून संघटनात्मक बांधणी केली जाऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसने शिवसेना पक्षासोबत जावे यासाठी दिल्लीतील नेत्यांचे मन वळविण्यात पृथ्वीराज चव्हाण यांची मोठी भूमीका होती. (हेही वाचा, Maharashtra Cabinet Expansion: ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर; हे आहे कारण)

दरम्यान, अशोक चव्हाण यांना काँग्रेसच्या वतीने ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचे खाते दिले जाण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री पद घेण्यापूर्वी राज्य सरकारमध्ये विविध खाती आणि मंत्रिपदे सांभाळली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, के. वेणुगोपाल आणि अहमद पटेल यांच्यात महाविकासआघाडी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक बैठक झाली. या बैठकीत मंत्रिपदासाठी संभाव्य नेत्यांच्या नावांचीही चर्चा झाल्याचे वृत्त आहे.