हिवाळी अधिवेशन संपल्यावर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार, 24 डिसेंबरला म्हणजेच आज होण्याची शक्यता होती. मात्र अजून काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी अंतिम न झाल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणखी काही दिवस लांबणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या याद्या मात्र तयार असल्याचे सांगण्यात येतय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली. या भेटीत शिवसेना आणि राष्ट्रवादीची विस्ताराची सगळी चर्चा पूर्ण झाली असून नावंही फायनल झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र काँग्रेसचा निर्णय अजुनही झालेला नाही. काँग्रेसची यादी न आल्यामुळे हा विस्तार लांबणीवर पडल्याची चर्चा आहे.
24 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे महाविकासआघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांकडून सांगण्यात येत होते. त्या दृष्टीने जोरदार तयारीही सुरु होती. मात्र काँग्रेसच्या मंत्र्यांच्या यादीचा घोळ अद्याप सुरु असल्या कारणाने मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळ विस्तार: पाहा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील कोणाची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत
काँग्रेसमधून कोणाला मंत्रिपद द्यायची याची अंतिम यादी ठरवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह काही नेते दिल्लीत दाखल झाले आहे. दिल्लीत काँग्रेसची यादी या दोन दिवसांत फायनल झाल्यास मंत्रिमंडळ विस्तार महिन्या अखेरीस केल्या जाण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. तर काँग्रेसनं निर्णय घेतला नाही तर कदाचित हा विस्तार नव्या वर्षाच्या सुरुवातील केला जाईल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. काँग्रेसकडून फारच उशीर होत असेल तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना शपथ दिली जाऊ शकते असेही काही नेत्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान दिल्लीत सोमवारी बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली. यावेळी माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांना मंत्रिमंडळात घ्यायचे काही नाही याबाबत अद्याप राज्यातील काँग्रेस नेत्यांसमोर पेच असल्यानं त्याबाबत विचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.