महाराष्ट्रामध्ये Guillain-Barre Syndrome (GBS)चा पहिला बळी गेला आहे. पुणेस्थित सीए ने जीबीएस मुळे जीव गमावला आहे. हा रूग्ण पुण्यामध्ये डीएसके विश्व भागात राहत होता. त्याला डायरियाचा त्रास होत होता. तो सोलापूरला त्याच्या घरी गेला होता.
रूग्णाला अशक्तपणा जाणवत होता त्यामुळे त्याला सोलापूर मध्ये हॉस्पिटल मध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्याला GBS झाल्याचे निदान केले. पुढील उपचारांसाठी त्याला आयसीयू मध्ये दाखल केले होते. तो त्याचे हात-पाय हलवू शकत नव्हता.त्याची प्रकृती स्थिर होती. शनिवारी त्याला आयसीयू मधून बाहेर काढण्यात आले. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला.
Guillain-Barre Syndrome हा एक दुर्मिळ immunological nerve disorder आहे ज्यामुळे अचानक सुन्नपणा आणि स्नायू कमकुवत होतात. या स्थितीत शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूंवर हल्ला करते.
योगायोगाने, पुणे जीबीएसच्या उद्रेकासाठी अनेक दिवसांपासून चर्चेत आहे कारण संक्रमित रुग्णांची संख्या 73 वर नोंदवली गेली आहे ज्यापैकी 14 व्हेंटिलेटरवर आहेत. शनिवारी जीबीएसचे नऊ संशयित रुग्ण आढळून आले. पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर असून परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांनी अनेक उपाययोजना केल्या आहेत.
पुणे महापालिकेच्या सूत्रांनुसार, जीबीएसच्या लक्षणांमध्ये अतिसार, पोटदुखी, ताप आणि मळमळ किंवा उलट्या यांचा समावेश होतो.
सूत्रांनी सांगितले की, “जीबीएस संसर्ग दूषित पाणी किंवा अन्न खाल्ल्याने होऊ शकतो. संसर्गामुळे अतिसार आणि पोटदुखी होऊ शकते. काही व्यक्तींमध्ये, रोगप्रतिकारक यंत्रणा मज्जातंतूंना लक्ष्य करते, ज्यामुळे 1 ते 3 आठवड्यांच्या आत GBS चे निदान होते. याव्यतिरिक्त, डेंग्यू, चिकनगुनिया व्हायरस किंवा इतर जीवाणूंच्या संसर्गामुळे रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूंवर हल्ला करते.”