Fire | (Photo Credits: Pixabay)

मुंबईतील मस्जिद बंदर (Masjid Bunder) भागात अब्दुल रेहमान रोडवरील (Abdul Rehman Street) व्यावसायिक इमारतीला आग लागल्याची घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली होती. त्या घटनेला 40 तास उलटून गेले तरीही त्या आगीवर अद्याप नियंत्रण मिळविण्यात आले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. ही आगीचे स्वरूप चौथ्या श्रेणीतील (Level 4) होते असे अग्निशमन अधिका-यांकडून सांगण्यात येत आहे. या आगीत मस्जिद बंदर येथील तीन मजली व्यावसायिक इमारतीचे प्रचंड नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ही आग तिस-या श्रेणीतील असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतर आगीचे गंभीर स्वरूप बघता याला चौथ्या श्रेणीतील आग असल्याचे घोषित करण्यात आले. मुंबई: मस्जिद बंदर येथील अब्दुल रेहमान रोड भागातील इमारतीला भीषण आग

 ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 17 गाड्या, जम्बो वॉटर टँकर, 3 'टर्न टेबल' शिड्या घटनास्थळी दाखल होत्या. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग ज्या इमारतीला लागली होती तेथे कटलरीचे दुकान होते जिथे चाकू, चमचे आणि रसायनांचे गोदाम होते. ज्यामुळे येथे आगीचे लोण पसरत गेले आणि त्यामुळे ती आग नियंत्रणात आणणे कठीण झाले.

मुंबईतील मंत्रालयाला 2012 मध्ये लागलेल्या आगीनंतर ही पहिली अशी आहे जी नियंत्रणात आणण्यासाठी एवढा वेळ लागला अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी दिली आहे. यात सुदैवाची गोष्ट म्हणजे यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीच्या ज्या मोठमोठ्या ज्वालांमुळे आणि धुरामुळे या परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.