Representational Image (Photo Credits: File Image)

दहा दिवसांच्या बाप्पांच्या सेवेनंतर 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या (Ananta Chaturdashi) दिवशी घरातील आणि सार्वजनिक गणेश मंडळातील बाप्पांचे विसर्जन झाले आहे. त्यासाठी मुंबईत विविध ठिकाणी विसर्जनाची तयारी करण्यात आली होती. मुंबई  (Mumbai)  मध्ये कांदिवलीत (Kandivali) पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये गॅंगस्टर आणि त्याच्या 3 साथीदारांना अटक केली आहे. डहाणूकरवाडी (Dahanukarwadi) भागामध्ये एका महिला पोलिस कर्मचारी सोबत वादावादी आणि तिच्यासोबत विनयभंग झाल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली आहे.

अटक झालेल्यांची नावं हरीश रामा मांडवीकर (45), दीपक गौतम पांडे (34), सुभाष हनुमानराव चौधरी (30), राजेश अरुण कोकिसरेकर (39) आहेत. मांडवीकर याच्यावर 10 खंडणीचे गुन्हे आहेत. त्याच्यावर शहरात प्राणघातक हल्ला आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून 2008 मध्ये मटका किंग सुरेश भगतच्या कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा तो मुख्य आरोपी होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, कांदिवली मध्ये गणेश विसर्जनाच्या ठिकाणी हा प्रकार झाला आहे. इथे भाविकांच्या एंट्री आणि एक्झिटसाठी वेगळ्या रांगा बनवण्यात आल्या होत्या. या ठिकाणी पोलिस ताफा तैनात होता. Molestation Case in Mumbai Local: मुंबई लोकल मध्ये योगा टीचरचा विनयभंग; 28 वर्षीय आरोपी अटकेत .

हरीश मांडवीकर आणि त्यांचे सहकारी बळजबरीने रांगेत घुसले आणि पोलीस अधिकाऱ्याला धमकावत प्रतिबंधित भागात गेले. पोलीस अधिकाऱ्याने त्याला रांगेत येऊन विसर्जन करण्यास सांगितले, मात्र त्याने पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याने एका महिला पोलिस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन केले आणि तिला ढकलून दिले, असे कांदिवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डी गणोरे यांनी सांगितले आहे.

मांडवीकर यांच्यासह चार आरोपींविरुद्ध पोलिसांशी हुज्जत घालणे आणि ड्युटीवर असलेल्या महिला पोलिस कॉन्स्टेबलचा विनयभंग केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला, असे गणोरे यांनी सांगितले आहे.