अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात असलेल्या पुणतांबा गावच्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. हे शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. विविध मागण्यांसाठी या शेतकऱ्यांनी पाच दिवसांचे धरणे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनास आजपासून सुरुवात झाली आहे. महत्त्वाचे असे की, याच गावातील शेतकऱ्यांनी पाच वर्षांपूर्वी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले होते. ज्याची देशभर चर्चा झाली.
पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी 2017 मध्ये 1 जूनपासून संप पुकारला होता. या संपाला प्रतिसाद देत देशभरातील शेतकऱ्यांनीही आंदोलन पुकारले. त्यामुळे तत्कालीन भाजप सरकारविरोधात शेतकरी संपाचा एक मोठाच भडका उडाला. आता पुन्हा एकदा पुनतांब्याचे शेतकऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. (हेही वाचा, Heatwave in Maharashtra: महाराष्ट्र तापला; उष्माघाताने उस्मानाबाद मध्ये घेतला एका शेतकर्याचा बळी)
शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे अश्वासन देत सरकारने विविध घोषणा केल्या आहेत. विविध स्तरावर प्रयत्नदेखील सुरु आहेत. असे असूनही शेतकरी आज मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या ऊसाला, कांद्याला, द्राक्ष, टरबूज अशा कोणत्याच पिकाला म्हणावा तसा भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी वारंवार अडचणीत सापडत आहे. परिणामी अडचणीत सापडलेल्या पुनतांबा येथील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. आजपासून पुढील पाच दिवसांसाठी शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे.