Fare Hike For Shared Cabs: मुंबईकरांनो लक्ष द्या! पुणे, नाशिक आणि शिर्डीसाठी कॅबचे भाडे वाढले; जाणून घ्या नवे दर
Driving | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Fare Hike For Shared Cabs: परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई ते नाशिक, शिर्डी आणि पुणे या मार्गावरील शेअरिंग कॅब सेवांसाठी (Sharing Cab Services) 50 रुपयांवरून 200 रुपयांपर्यंत दर वाढवण्याची घोषणा केली आहे. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण (MMRTA) ने या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या बैठकीत या मार्गांवरील काळ्या आणि पिवळ्या नॉन-एसी टॅक्सी आणि निळ्या व सिल्व्हर एसी टॅक्सींच्या दरवाढीला मान्यता दिली.

मुंबईहून सुटणाऱ्या प्रवाशांना आता एसी टॅक्सीसाठी नाशिकसाठी 100 रुपये आणि शिर्डीसाठी 200 रुपये जादा मोजावे लागतील. तर पुण्यासाठी एसी आणि नॉन-एसी टॅक्सी प्रवासासाठी अतिरिक्त 50 रुपये मोजावे लागतील. मुंबई-नाशिक आणि मुंबई-शिर्डी मार्गांसाठी सुधारित एसी टॅक्सीच्या किमती अनुक्रमे 575 रुपये आणि 825 रुपये असतील. मुंबई-पुणे मार्गावरील नॉन-एसी टॅक्सींचे भाडे 500 रुपये आहे, तर एसी कॅबचे भाडे 575 रुपये आहे.

अहवालानुसार, टॅक्सी भाड्याचे पुनरावलोकन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या खटुआ पॅनेलच्या शिफारशींच्या आधारे, तसेच या मार्गांवर चालणाऱ्या टॅक्सी युनियनच्या प्रतिनिधींच्या मागण्यांवर आधारित भाडे सुधारणा स्वीकारण्यात आली होती. शुल्कवाढीच्या अंमलबजावणीची तारीख जाहीर करण्यात आली नसली तरी पुढील महिन्यापासून ती लागू होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. (हेही वाचा: Thane News: पासपोर्ट मागणीसाठी पोलिसांनी मागितली लाच, ठाण्यातील दोन पोलिसांना अटक)

एमएमआरटीएने प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (RTOs) दादर, मुंबई येथील टॅक्सी बूथवर सुधारित दर जाहीर करण्यास सांगितले आहे. अहवालात म्हटले आहे की, टॅक्सी युनियनने आवाहन करूनही प्राधिकरणाने सप्टेंबर 2013 पासून मुंबई-नाशिक आणि मुंबई-शिर्डी मार्गावरील दरात वाढ केलेली नाही, तर मुंबई-पुणे मार्गावरील दरात ऑगस्ट 2021 मध्ये सुधारणा करण्यात आली होती. पुणे, नाशिक आणि शिर्डी येथे जाण्यासाठी प्रवासी नियमितपणे रेल्वे आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) बस सेवांव्यतिरिक्त सामायिक टॅक्सी वापरतात. मात्र, खासगी बस आणि टॅक्सींमुळे होत असलेल्या व्यवसायाबाबत कॅब चालकांनी चिंता व्यक्त केली आहे तसेच आरटीओ त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही केला आहे.