Fake COVID-19 Vaccine Scam: खोट्या लस घोटाळ्याचा मुंबईच्या Aditya College लाही फटका? तक्रार दाखल
Coronavirus (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रामध्ये आजपासून 30 ते 44 वयोगटातील लोकांचे कोरोना विषाणू लसीकरण (Coronavirus Vaccination) सुरू झाले. कोरोना विषाणूशी लढण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवत आहे. मात्र सध्या मुंबईमध्ये (Mumbai) खोट्या लसीचा घोटाळा (Fake COVID-19 Vaccine Scam) उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मुंबईतील कांदिवली परिसरातील हाय प्रोफाइल हिरानंदानी हेरिटेज इमारतीत फेक व्हॅक्सिन ड्राईव्ह पार पडले होते. त्यांनतर आता शनिवारी बोरिवली पश्चिम येथील आदित्य कॉलेजने (Aditya College) दावा केला आहे की, या महिन्याच्या सुरुवातीला एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने कॅम्पसमध्ये केलेल्या लसीकरण मोहिमेत आपली फसवणूक झाली असावी.

शहरातील विविध ठिकाणी बनावट लसीकरण शिबिर आयोजित करणाऱ्या 4 आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये 3 जून रोजी बोरिवलीतील आदित्य कॉलेज परिसरात आरोपींपैकी एक राजेश पांडे याने लसीकरण शिबिर आयोजित केले होते. आता महाविद्यालयाने बोरिवली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे आणि निवेदनात म्हटले आहे की, आरोपींनी आपण कोकिलाबेन रुग्णालयातील कर्मचारी असल्याचे सांगून हे लसीकरण शिबिर आयोजित केले.

महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी सांगितले की, लसीकरण मोहीम एका कंपनीच्या माध्यमातून आयोजित केली गेली होती, ज्याचे व्यवस्थापन कोकिलाबेन रुग्णालयाचे विक्री विभाग, मुख्य व्यवस्थापक राजेश पांडे याने केले होते. त्याने आश्वासन दिले की संपूर्ण लसीकरण मोहीम त्याच्या रुग्णालयाच्या देखरेखीखाली पार पडेल आणि सर्व आवश्यक परवानग्या व कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्याची जबाबदारी त्याची असेल व महाविद्यालयाची जबाबदारी केवळ पैसे देण्यापुरतीच मर्यादित राहील.

महाविद्यालयाने यावेळी आपले विद्यार्थी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच महाविद्यालयातील विश्वस्त अशा 18 ते 44 वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. मात्र कांदिवली येथील सोसायटीमध्ये झालेली फसवणूक आणि लसीचे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब झाल्यावर आता आदित्य महाविद्यालयाने लसीकरण मोहिमेच्या आयोजकांविरोधात औपचारिक पोलिस तक्रार दाखल केली आहे. (हेही वाचा: Fake COVID-19 Vaccine Scam: मुंबईमध्ये बनावट कोविड-19 लसीचा मोठा घोटाळा; 10 वी पास सूत्रधारासह 5 जणांना अटक)

सक्षम अधिकाऱ्यांद्वारे या प्रकरणाची चौकशी होत आहे व त्याबाबतच्या पुढील प्रगतीबद्दल आपणा सर्वांना माहिती दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे.