Fact Check: 'खुशखबर! पुणे-सातारा रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी खेड-शिवापूर टोल नाक्यावर टोल भरू नये'
Khed-Shivapur Toll Plaza Viral message | (Photo Credits: Wikimedia Commons)

Fact Check About Khed-Shivapur Toll Plaza: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाचा दाखला देत 'खुशखबर! पुणे-सातारा (Pune Satara Highway) रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी खेड-शिवापूर टोल नाक्यावर (Khed-Shivapur Toll Plaza) टोल भरू नये' असा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मसेजमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्राची एक फोटोप्रतही जोडण्यात आली आहे. मात्र, या मेसेजची सत्यता पडताळली असता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अशा प्रकारचा कोणताही आदेश देण्यात आला नसल्याचे पुढे आले आहे. तसेच, जिल्हाधिकारी कार्यालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठविलेल्या पत्राचा अर्धवट भाग सोशल मिडीयावर पसरवून काही मंडळी नागरिकांची दिशाभूल करत असल्याचेही या माध्यमातून पुढे येत आहे.

काय आहे व्हायरल होत असलेला मेसेज?

पुणे-सातारा रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या mh12 आणि mh14 पासिंगच्या वाहनांनी खेड-शिवापूर टोल नाक्यावर उद्यापासून टोल भरू नये, हे आदेश जिल्हाधिकारीकार्यालयाने दिले आहेत.

या मेसेजमागचे सत्य तपासले असता पुढे आले की, संबंधीत पत्र हे मूळ पत्रातील केवळ आर्धाच भाग आहे. मूळ पत्र हे जिल्हाधिकारी कार्यालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मुख्य प्रबंधक यांना पाठवले आहे. या पत्रात केवळ खेड-शिवापूर टोल नाका संदर्भाद आजवर झालेली आंदोलने, बैठका, तसेच, आंदोलक आणि विविध संघटनांनी केलेल्या मागण्यांचा उल्लेख आहे. (हेही वाचा, तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवासादरम्यान घरी चोरी झाल्यास मिळणार 1 लाख रुपयांचा विमा)

दरम्यान, खेड-शिवापूर टोल नाका संदर्भात सन 2011 मध्ये एक आंदोलन झाले होते. या आंदोलनात विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी सहभागी होते. या वेळी पुणे-सातारा टोल रोड कंपनी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि आंदोलनकर्ते लोकप्रतिनिधि यांच्यात एक बैठक पार पडली होती. या बैठकीत खेड-शिवापूर टोल नाका ज़ोपर्यन्त भोर तालुक्याच्या हद्दीबाहेर हलविला जात नाही, तोपर्यन्त mh12 आणि mh14 पासिंगच्या वाहनांकडून टोल घेण्यात येऊ नये, अशी जोरदार मागणी करण्यात आली होती. मात्र, या पत्राचा संपूर्ण तपशील प्रसारीत न करता केवळ अर्धवट तपशील प्रसारीत करुन नागरीक, प्रवासी आणि वाहन चालक आदींची दिशाभूल केली जात असल्याचे पुढे आले आहे.