UGC Final Year Examination: विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन परीक्षा घेण्यात येतील - उदय सामंत
Uday Samant | (File Photo)

UGC Final Year Examination: सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात (UGC Final Year Examination) दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर निकाल दिला. परीक्षा रद्द होऊ शकत नाही. परंतु, राज्य सरकार युजीसी (UGC) सोबत बोलून परीक्षांच्या तारखा पुढे ढकलू शकते, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. या निर्णयावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आपली भूमिक स्पष्ट केली आहे.

कुलगुरूंशी चर्चा करून परीक्षा घेण्यासंदर्भात पुढील निर्णय घेतला जाईल. तसेच विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन परीक्षा घेण्यात येतील, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - UGC Final Year Examinations Case: विद्यापीठांच्या अंंतिम वर्षाच्या परीक्षा होणार, राज्य सरकारने UGC शी सल्लामसलत करून तारखा ठरवा; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

दरम्यान, यासंदर्भात बोलताना उदय सामंत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा मी आदर करतो. राज्य सरकारने न्यायालयात विद्यार्थी आणि पालकांची भूमिका ठामपणे मांडली. परंतु, न्यायालयाने परीक्षा घेण्याचा निर्णय दिला आहे, असंही सामंत यांनी सांगितलं.

राज्य सरकारने कोणतंही संकट नसताना परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला नव्हता. तर कोरोना संकटामुळे विद्यार्थी, पालक आणि सर्व वस्तुस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर करून भविष्यात परीक्षा कशा घ्यायची यासंदर्भात चर्चा करावी लागेल. यूजीसीकडून वेळ मागून घेण्यासाठी निर्णय घ्यावे लागतील. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, परीक्षा घेण्यासंदर्भात मार्ग काढावा लागणार आहे. यासाठी कुलगुरूंशी चर्चा करून परीक्षा घेण्यासंदर्भात पुढील निर्णय घेतला जाईल, असंही सामंत यांनी म्हटलं आहे.