Women to Drive MSTRC Buses (Photo Credits: ANI)

पुणे (Pune)  येथील बालगंधर्व रंगमंदिरात काल, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील (Pratibha Patil) यांच्या हस्ते एसटी महामंडळाच्या (MSRTC)  एका नव्या उपक्रमाची सुरुवात झाली. राज्यातील विविध भागातील तरुणींना एसटीच्या बसचालक पदासाठी प्रशिक्षण देण्याच्या अनुषंगाने या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. काल उदघाट्न प्रसंगी 163 महिलांच्या पहिल्या तुकडीची घोषणा करण्यात आली. यामध्ये आदिवासी समुदायातील 21 महिलांचा सुद्धा समावेश आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष परिवहन मंत्री दिवाकर रावते (Divakar Raote) यांच्यासह विधानसभा उप सभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe), भाजपाच्या शहराध्यक्ष आणि आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) व एसटी महामंडळाचे अन्य मान्यवर देखील उपस्थित होते.

प्राप्त माहितीनुसार, सद्य स्थितीला एसटी महामंडळात तब्बल 36,000 पुरुष बस चालक आहेत,या कामासाठी महिलांना देखील संधी मिळावी याकरिता एसटीने तब्बल 10 हजार महिलांच्या प्रशिक्षण प्रकल्पाची सुरुवात केली आहे. (मुंबई: प्रतिक्षा दास होणार पहिली महिला BEST बस चालक; वयाच्या 24 व्या वर्षी बेस्ट कामगिरी)

ANI ट्विट 

यापूर्वी 2017 मध्ये सुद्धा एसटी तर्फे हा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र कायद्याच्या अडथळ्याने मंडळाला केवळ बस वाहक पदी  महिलांची नियुक्ती करणे शक्य झाले होते. तसेच शासनाच्या नियमावलीनुसार बसचालक पदी नियुक्तीतीच्या आधी संबंधित उमेदवाराला निदान तीन वर्षे जड वाहने चालवण्याचा अनुभव असणे बंधनकारक होते. मात्र आता या नियमात बदल करण्यात आल्याने या महिलांना मंडळातर्फेच एका वर्षाचे अधिकृत ट्रेनिंग देऊन तयार केले जाईल. या प्रशिक्षणानंतर मात्र त्यांना ड्रायव्हिंग टेस्ट देणं बंधनकारक असेल, अशी माहिती दिवाकर रावते यांनी दिली.

दरम्यान, या प्रकल्पाविषयी बोलताना प्रतिभा पाटील यांनी शासनाचे कौतुक करत ज्याप्रमाणें आपण पहिल्या राष्ट्रपती झालो तसेच या महिला एसटी बसचालक म्हणून काम करून इतिहास घडवतील अशी आशा व्यक्त केली. तर उपसभापती गोऱ्हे यांनी देखील आपण या महिलांच्या आरोग्यासाठी शौचालयाची सुविधा पुरवणार आहोत तर त्यांना सुरक्षित वातावरण देणे हे ध्येय असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रकल्पात समाविष्ट महिलांनी सुद्धा आपल्याला मिळालेल्या संधीसाठी महामंडळाचे आभार मानले.