ED Takes Pratap Sarnaik's son Vihang in Custody: प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक ईडीच्या ताब्यात
Pratap Sarnaik, Vihang Sarnaik | (Photo Credit: Instagram)

शिवसेना (Shiv Sena) आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक ( Vihang Sarnaik) यांना सक्तवसुली संचालनालय (Enforcement Directorate) अधिकाऱ्यांच्या पथकाने ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. आज (24 नोव्हेंबर) सकाळी 7 वाजणेच्या सुमारास ईडी (ED) पथक प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले. अद्यापही चौकशी सुरु आहे. मात्र, विहंग सरनाईक यांना ईडीचे पथक नेमके कोठे घेऊन गेले याबाबत अध्याप स्पष्टता नाही. प्राप्त माहितीनुसार, प्रताप सरनाईक यांच्या कुटुंबीयांपैकी केवळ विहंग सरनाईक यांनाच ईडीने आपल्या सोबत घेतले आहे. त्यांचे इतर कुटुंबीयांना ताब्यात घेतले नसल्याचे समजते. पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमधून सरनाईक यांना ईडीने सोबत गेऊन गेल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, विहंग सरनाईक यांना ईडी कार्यालायत चौकशीसाठी घेऊन गेल्याचे समजते.

शिवसेनेच्या इतरही काही ज्येष्ठ नेत्यांना ईडीची नोटीस मिळाल्याचे वृत्त आहे.  ईडीने शिवसेनेच्या ज्या नेत्यांना नोटीस बजावली आहे त्यात शिवसेनेच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांची नावे ईडीने अद्याप जाहीर केली नाहीत. परंतू, सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात हे नेते अत्यंत ज्येष्ठ असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने शोधमोहीम हाती घेतल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. महाविकासआघाडीमधील नेते आक्रमक झाले असून, शिवसेना नेते संजय राऊत, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. (हेही वाचा, Sanjay Raut On ED: सुरुवात तुम्ही केलीय, शेवट आम्ही करु; आमदार, खासदारांच्या दारात ईडीने कार्यालय थाटले तरी आम्ही घाबरत नाही- संजय राऊत)

ईडीने आमच्या आमदारांच्या दारात जरी कार्यालय थाटले तरी आम्ही घाबरत नाही. आमचे आमदार शरण जाणार नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर, जो बोलतो त्याच्याविरोधात केंद्र सरकार कारवाई करत असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात  यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे. त्यामुळेच ते ईडी, सीबीआय, एनसीबी आदी संस्थांच्या माध्यमातून कारवाई करत असल्याचे म्हटले आहे.