अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) विभागाने म्हणजेच ईडीने (ED) आज मोठी कारवाई केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंधू श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांची ठाणे येथील मालमत्ता ईडीने (ED) जप्त आहे. ही मालमत्ता म्हणजे ठाणे येथील पाटणकर यांच्या निलांबरी प्रोजेक्टमधील 11 सदनिका आहेत. ईडीने पुष्पक ग्रुपची 6 कोटी 45 लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. पुष्पक ग्रुपवर कारवाई करतानाच पाटणकर यांच्याही काही सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावरच ही कारवाई झाल्याने आगामी काळात केंद्रीय तपास यंत्रणांचे लक्ष्य हे काय असेल याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. संपूर्ण राज्य आणि देशभर चर्चेत आलेले हे प्रकरण नेमके आहे तरी काय? घ्या जाणून
काय आहे प्रकरण?
अंमलबजावणी संचालनालय अर्थातच इडीने आज पुष्पक ग्रुपवर मोठी कारवाई केली. ज्याचा संबंध मुख्यमंत्र्यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्याशी लावला जातो आहे. ईडीने आज ठाण्यातील निलांबरी अपार्टमेंट्स येथील 11 सदनिका जप्त केल्या. या सदनिका श्रीधर पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. ईडीचे म्हणने असे की, जप्त करण्यात आलेल्या सदनिकांची किंमत सुमारे 6.45 कोटी रुपयांच्या घरात आहेत. या प्रकरणात ईडीकडून पहिला गुन्हा 6 मार्च 2017 रोजी PMLA कायद्याअंतर्गत नोंदविण्यात आला होता. हा गुन्हा मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित होता. या प्रकरणात या आधाही ईडीने पुष्पक बुलियनची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती. आता पुन्हा कारवाई करत आणखी काही संपत्ती ईडीने जप्त केली आहे. (हेही वाचा, Aditya Thackeray On Shridhar Patankar: श्रीधर पाटणकर यांच्यावरील ईडी कारवाई प्रकरणी आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया)
आरोप आहे की, श्री साईबाबा गृहनिर्मीती समिती प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून 30 कोटी रुपयांचे असुरक्षीत कर्ज घेण्यात आले. हे कर्ज नंदकिशोर चतुर्वेदी नावाच्या एका व्यक्तीच्या माध्यमातून घेण्यात आले. हा चतुर्वेदी हा इसम एक एंट्री ऑपरेटर असल्याचे सांगितले जात आहे. या ऑपरेटर्सच्या माध्यमातून मिळालेल्या पैशातूनच पाटणकर यांनी ठाण्यात 11 सदनिका खरेदी केल्याचा आरोप आहे. मनी लॉन्ड्रींगमधील पैसा हा या सदनिका खरेदी करण्यासाठी वापरण्यात आला असावा असा संशय ईडीला आहे.