Elphinstone Bridge | X @Samay84

मुंबई मध्ये ब्रिटीशकालीन 125 वर्ष जुना एल्फिन्स्टन पूल (Elphinstone Bridge) पाडला जाणार आहे. या पुलाच्या पाडकामानंतर वाहतूकीमध्ये बदल करावे लागणार आहेत. त्यासाठी नागरिकांकडून डायव्हर्जन साठी सूचना मागवण्यात आल्या आहेत. 13 एप्रिल 2025 पूर्वी नागरिकांनी addlcp.traffic@mahapolice.gov.in वर सूचना पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पूल पडण्याचे काम MMRDA कडून हाती घेण्यात आले आहे. 10 एप्रिल नंतर हा पूल पाडला जाण्याची शक्यता आहे.

सध्याचा एल्फिन्स्टन पूल, जो फक्त 13 मीटर रुंद आहे आणि प्रत्येक दिशेने 1.5 लेन आहेत, त्याऐवजी चार लेनचा डबल-डेकर पूल बनवला जाईल. खालचा डेक डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड आणि सेनापती बापट रोडला जोडेल, जो जुन्या पुलाच्या जागी काम करेल.

कोणत्या भागात वाहतूकीमध्ये बदल होण्याचा अंदाज?

पूर्व-पश्चिम कनेक्टर बंद झाल्यामुळे परळ भागामध्ये वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. परळ हा आधीच गर्दीचा भाग असल्याने आता या वाहतूकीमधील बदलामुळे अधिक कोंडी निर्माण करणारा आहे. या भागात टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि केईएम हॉस्पिटल सारखी प्रमुख रुग्णालये आहेत. गेल्या काही वर्षांत, जुन्या गिरण्यांच्या जमिनींचा मॉल आणि ऑफिस कॉम्प्लेक्समध्ये पुनर्विकास केल्याने परिसरातील वाहतुक कोंडी आणखी वाढली आहे.

वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग कोणते?

वाहतूक व्यवस्था बिघडू नये आणि सार्वजनिक सुरक्षितता वाढवण्यासाठी, पोलिस उपायुक्त (पूर्व उपनगरीय, वाहतूक) प्रदीप चव्हाण यांनी पर्यायी मार्ग दिले आहेत. पूल बंद असताना वाहने दादरमधील टिळक पूल आणि करी रोड पुलावरून वळवली जातील.

पादचाऱ्यांसाठी, परळ स्थानकाजवळील सध्याचा पादचारी पूल हा non-ticketed zone म्हणून नियुक्त केला जाईल.याव्यतिरिक्त, प्रभादेवी स्थानकाजवळील एक नवीन पादचारी पूल बांधण्यात येत आहे आणि लवकरच तो खुला होण्याची अपेक्षा आहे.

पुलाच्या दोन्ही बाजूला आपत्कालीन सेवा सज्ज

एक रुग्णवाहिका प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाच्या पश्चिम बाजूला तैनात असेल, तर दुसरी परळ रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूला उपलब्ध असेल. रुग्णांसाठी व्हीलचेअरची देखील व्यवस्था केली जाईल.