Power Tariff Hike in Mumbai: मुंबईकरांनो वाढत्या विजबीलासाठी सज्ज राहा! विज दर 18 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता
Electricity | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबई शहरांतील बेटांच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) ने मुंबई शहरात वीज दरात वाढ (Power Tariff Hike in Mumbai) केली आहे. परिणामी या नागरिकांसाठी पुढील महिन्यापासून मासिक विजबील (Electricity Bills) वाढवून येऊ शकते. बेस्टने याबाबत सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, 2023-24 मध्ये वीज दरात 18 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. याबाबत बेस्टने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे (MERC) याचिका दाखल केली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, वीज दरवाढीचा सर्वाधिक फटका हा चाळींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, उंच इमारतींमध्ये राहणाऱ्यांना 2 टक्के वीज दरवाढीचा फटका बसण्याची अपेक्षा आहे कारण बेस्टला या वापरकर्त्यांना टाटा पॉवरकडे स्थलांतरित होण्यापासून रोखायचे आहे.

गेल्या आठवड्यात अदानी इलेक्ट्रिसिटीने निवासस्थानांसाठी वीज दरात 2 ते 7 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर 18 टक्क्यांपर्यंत वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव आला आहे. दरम्यान, टाटा पॉवरने लो-एंड ग्राहकांसाठी वीज दरात 10-30 टक्के आणि उच्च श्रेणीतील ग्राहकांसाठी 6 ते 7 टक्क्यांनी वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. (हेही वाचा, Electricity Bill Payment: तामिळनाडू-महाराष्ट्रासह 13 राज्ये वीज खरेदी करू शकणार नाहीत; 5000 कोटींची थकबाकी न भरल्यास होणार कारवाई)

दरम्यान, बेस्टने वीज दरात 18 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला असताना, दुकाने, कार्यालये आणि व्यावसायिक आस्थापनांच्या वापरकर्त्यांसाठीही काहीशी आनंदाची बातमी आहे. बेस्टने उपरोक्त वापरकर्त्यांसाठी 6 टक्के शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान, बेस्टने शहरातील हाऊसिंग सोसायट्यांमधील वाहन चार्जिंग स्टेशनसाठी ऊर्जा शुल्क 16 टक्क्यांनी कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

रेल्वे, मेट्रो आणि मोनोरेलसाठी वीज पुरवठा करण्यासाठी शुल्कात 12 टक्के घट प्रस्तावित करण्यात आली आहे. तर बेस्ट उपक्रमाने सार्वजनिक सेवा, सरकारी रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांसाठी ऊर्जा शुल्कात 6 टक्के कपात करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. एकूणच, बेस्टने 2023-24 साठी सरासरी 14 टक्के आणि 2024-25 साठी 4 टक्के भाडेवाढ प्रस्तावित केली आहे.