ED seizes cash, assets worth Rs 32 crore in Vasai-Virar civic body land scam

मुंबई मध्ये एक मोठा घोटाळा समोर आला आहे. यामध्ये ईडीने (ED) वसई-विरार महानगरपालिकेशी  (Vasai Virar City Municipal Corporation) निगडीत एक कोट्यावधींचा भ्रष्टाचार समोर आणला आहे. ईडी च्या या कारवाईच्या वरून वसई विरार महानगरपालिकेच्या नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्या हैदराबादेतील घरावर छापेमारी केली आहे. या छापेमारीत ईडीने 8 कोटी 6 लाख रुपयांची रोकड आणि 23 कोटी 25 लाख रुपये किमतीचे सोने आणि दागिने जप्त केले आहेत. मीरा भाईंदर पोलिस आयुक्तालयाने नोंदवलेल्या अनेक एफआयआरच्या आधारे आर्थिक तपास संस्थेने सुरू केलेल्या तपासाचा भाग म्हणून हे छापे टाकण्यात आले.

नालासोपारा मधील अनधिकृत 41 इमारती घोटाळा प्रकरणी ईडी कडून चौकशी सुरू आहे. या इमारती नुकत्याच जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. या अनधिकृत इमारती माजी नगरसेवक सीताराम गुप्ता, अनिल गुप्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बांधल्याचा आरोप आहे.

ईडीच्या कारवाई मध्ये पैसे, दागिने जप्त

नालासोपारा येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि कचरा टाकण्यासाठी राखीव असलेल्या 30 एकर जमिनीवर 41 निवासी आणि व्यावसायिक इमारती बेकायदेशीरपणे बांधल्या गेल्याची माहिती ईडीने दिली आहे. असा आरोप आहे की बांधकाम व्यावसायिक आणि काही स्थानिक दलालांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे या इमारतींना मंजुरी मिळवून दिली आणि नंतर लोकांची फसवणूक करून तेथे फ्लॅट विकले.

वाय. एस. रेड्डी हे यापूर्वीही भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अडकले आहेत. एप्रिल 2016 मध्ये, त्यांना शिवसेनेच्या नगरसेवकाला 25 लाख रुपये लाच देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अटक करण्यात आली होती.यानंतर मे 2016 मध्ये त्यांना निलंबित करण्यात आले. आता पुन्हा एकदा रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत, ज्यामुळे महापालिकेत पसरलेल्या भ्रष्टाचाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.