ED Raids: ईडीने टाकलेल्या छापेमारी नंतर Anil Parab यांनी दिली प्रतिक्रिया; न्यायालयात मांडणार भूमिका
मंत्री अनिल परब | (File Photo)

आज सकाळी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) परिवहन मंत्री अनिल परब (Minister Anil Parab) यांच्या सात ठिकाणांवर छापे टाकले. ईडीने त्यांच्या मुंबई आणि पुण्यातील सात ठिकाणी छापे टाकले आहेत. छापेमारीनंतर ईडीने अनिल परब यांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले. तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीचे पथक राज्याचे मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानावरून बाहेर पडले. यानंतर पत्रकारांशी बोलताना अनिल परब यांनी साई रेसॉर्ट प्रकरणी ही चौकशी करण्यात आल्याचं सांगितले आहे.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘ईडीने आज माझ्या घरावर, सरकारी बंगल्यावर आणि माझ्या सहकाऱ्यांवर छापे टाकले. दापोलीतील साई रिसॉर्ट, ज्याचे अजून काम सुरू नाही, तिथून सांडपाणी समुद्रात जाते अशी तक्रार पर्यावरण मंत्रालयाने दिली. त्यावरून आज ईडीच्या लोकांनी ही छापेमारी केली. यावर आता मनी लॉड्रिंगचा मुद्दा येतोय कुठे? या संबंधी आपण न्यायालयात भूमिका मांडू.’

ते पुढे म्हणाले, ‘मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की माझा रिसॉर्टशी कोणताही संबंध नाही. त्याचे मालक सदानंद कदम आहेत. त्यांच्यावर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा नियोजित गुन्हा असल्याने ईडीने कारवाई केली. कायदेशीर मार्गाने पुढे कसे जायचे ते आपण पाहू.’

(हेही वाचा: ED Raids On Anil Parab: मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी)

फ्री प्रेस जर्नलनुसार, दापोलीमध्ये परब यांनी 2017 मध्ये 1 कोटी रुपयांच्या मोबदल्यात जमीन खरेदी केली होती. ज्याची 2019 मध्ये नोंदणी झाली. त्यानंतर ही जमीन मुंबईतील केबल ऑपरेटर सदानंद कदम यांना 2020 मध्ये 1.10 कोटी रुपयांना विकली. याच जमिनीवर 2017 ते 2020 या काळात रिसॉर्ट बांधण्यात आले. आता पर्यावरण मंत्रालयाच्या सूचनेमध्ये, दापोली रिसॉर्टची इमारत आणि रस्ता हा CRZ-III अंतर्गत नो-डेव्हलपमेंट झोन म्हणून पात्र ठरणाऱ्या हाय टाइड झोनच्या 200 मीटरच्या आत येतो असे नमूद केले आहे. परंतु आता परब यांनी या रिसॉर्टशी आपला संबंध असल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे.