Earthquake. (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस, अतिवृष्टी सारख्या धक्क्यांनी संपूर्ण देश हादरला असून यात भूकंपाचे धक्के (Earthquake) बसण्याची मालिका देखील सुरु आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याच्या बातम्या कानावर येत आहेत. त्यात आज नागपूरच्या (Nagpur) उत्तर आणि उत्तर पूर्व (North and North East) भागात भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याची माहिती समोर येत आहे. आज पहाटे 4 वाजून 10 मिनिटांनी या भागात भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टेर स्केल इतकी होती. या भूकंपाच्या धक्क्यांनी नागपूर जिल्ह्यातील उत्तर आणि उत्तर पूर्व भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

महाराष्ट्रात भूकंपाचे सत्र सुरुच असून गेल्या अनेक महिन्यांपासून भूकंपाच्या घटना सतत कानावर ऐकायला मिळत आहे. आतापर्यंत मुंबई, पुणे, नाशिक, पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसल्याच्या घटना आहेत. यात नाशिक आणि पालघर मध्ये वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहे. हेदेखील वाचा- Earthquakes in Maharashtra: आज पहाटे नाशिक, पालघर सौम्य भूकंपाच्या धक्क्याने पुन्हा हादरलं

महिन्याभरापूर्वी नाशिक मध्ये 3.6 रिश्टर स्केल चे भूकंपाचे धक्के बसले होते. तर मुंबईतही भूकंपाचे धक्के जाणवले होते. आधीच कोरोना व्हायरसमुळे मेटाकुटीला आलेले लोक आता भूकंपाच्या धक्क्यांनी हादरून गेले आहेत.

दरम्यान, भूकंपाचे धक्के जाणवल्यास नागरिकांनी सावधानी बाळगावी. खिडक्या, दरवाजे किंवा उंच इमारतींपासून दूर रहावे. स्वत:ची जागा सोडण्यापूर्वी घरातील अन्य लोकांच्या सुरक्षिततेकडे सुद्धा लक्ष द्या. एवढेच नाही तर भूकंपाचे धक्के जाणवण्याच्या वेळी तुम्ही जर लिफ्ट मध्ये असाल तर लगेच त्या बाहेर पडा जेणेकरुन तुम्हाला दुखापत होणार नाही. त्याचसोबत ड्रायव्हिंग करत असल्यास गाडी रस्त्याच्या एका बाजूला लावत ती बंद करा. अशा काही गोष्टी लक्षात घेता भूकंपाच्या वेळी निर्माण होणाऱ्या समस्येपासून तुम्ही स्वत:चा बचाव करु शकता. असे प्रशासनाकडून वारंवास सांगण्यात येत आहे.